पान:मनतरंग.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गूळ घालून त्याचे मुटके करून ते शिजवतात. त्या मुटक्यांचा नैवेद्य…या मुटक्यांना 'फळ' म्हणतात…लक्ष्मीला वाहतात वृक्षवल्ली आणि घरातील मुले हे समाजाचे धन आहे. हे धन सुरक्षित राहावे, दीर्घायुषी व्हावे, या धनाची वृद्धी व्हावी, हा हेतू पूजेमागे असतो. काश्मीर, केरळ, राजस्थान, बंगाल, आंध्र, गुजरात…आदी सर्व प्रदेशांत वृक्षपूजा केली जाते. झाडांच्या बुंध्याच्या भोवताली विविध धान्यांचा वापर करून, रंगसंगती साधून सजावट करतात. ही सजावट करताना झाडांची स्तुती…महती गाणारी लोकगीते स्त्रिया म्हणतात. झाडांची पूजा करून त्यांच्यापुढे दिवा लावतात.

 पावसाळा सुरू झाला की साथीचे रोग येतात. विशेषतः लहान मुलांना होणाऱ्या त्रासदायक रोगांची लागण वाढते. पूर्वी घरोघर आजीबाईचा बटवा असला तरी शुभमय भविष्याची कामना या व्रतांच्या माध्यमातून केली जात असावी. आज विज्ञानाचा सर्वांगीण विकास झाला आहे. तो सतत पुढे धावतो आहे. जगणे पूर्वीइतके सुरक्षित राहिलेले नाही. तरीही जीवनाच्या वस्त्रात एक कलाबुती धागा 'नशीब', 'दैवयोग' यांचा असतो. आपण कितीही पूर्णत्वाने प्रयत्न केले तरी, 'यश' मिळेल की नाही हा संभ्रम मानवी मनात ऊन-सावलीचा खेळ मांडत असतो. आणि म्हणूनच भविष्यासाठी शुभमय कामना व्यक्त करणारी व्रते…सण…उत्सव यांचे महत्त्व २१ व्याशतकात कमी झाले नाही… होणारही नाही. वृक्षपूजा जणू पाऊसकाळाचे समाजाने केलेले स्वागतच आहे.

■ ■ ■

'वृक्षपूजा...'पाऊसकाळाचे स्वागत /९