पान:मनतरंग.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिच्या पोषाखामुळे ? 'शिक्षण आणि पोषाख, शिक्षण आणि वागण्याची रीत यांच्यात नाते असते का ? असावे का ? आणि जगण्याच्या धकाधकीत ते नाते आम्हांला बांधता येते...? आकंठ इच्छा असली तरीही...?
 "भाबी, ते अमूक अमूक पी.एस.आय. तुम्हाला भेटायचं म्हणतायेत. कधी घेऊन येऊ ?" आमच्या कार्यकर्त्याने विचारले.
 "आता दिवाळीच्या घाईत कुठे भेटणार ?" माझी अडचण मी सांगितली.
 "पण त्यांची अडचण त्यांनी कोणाजवळ सांगावी ? काढा एक तास." या आग्रहापुढे मी मान तुकवली.
 "ताई, आठ दिवसांखाली, आमच्या एवढ्याशा गावातल्या एस.टी. स्टँडमागच्या बाजूला असलेल्या एका घरावर आम्ही भर दुपारी धाड टाकली. एका घरवाल्या बाईला तिच्या घरातल्या चार पोरींसह पकडले. काय सांगू तुम्हाला, त्या दोन बाया शिकलेल्या आहेत. एक विधवा आहे. नवरा अपघातात मरण पावला. दोन लहान पोरं आहेत. सासरच्यांचा आधार नाही. माहेरी फक्त दोन भाऊ आहेत, ते विचारीत नाहीत. पोरांच्या शिक्षणासाठी या बाईला हा मार्ग शोधावा लागला. बी.ए. झाली ती लग्नानंतर. जेमतेम पंचेचाळीस टक्के मार्कस् आहेत. तिला कोण देणार नोकरी ? दर दर भटकली. शेवटी या घरवाल्या बाईने तिला ही वाट दाखवली. तिचे पितळ उघडे पडले तर बहिणीकडे ठेवलेल्या मुलांचा आधार तुटेल. बहिणीकडे शिक्षणासाठी लेकरं ठेवली आहेत. महिन्याला आठशे रुपये पाठवते. धाईधाई रडून विनवतेय की, असे करू नका. काय करावं ते मलाही सुचेना. गाव लहान आहे. काही गवगवा होण्यापूर्वी तुमच्या संस्थेत ठेवून घ्याल का ? निदान तिच्याशी बोला. तिला काही मार्ग दाखवाल का ?" तो तरुण अधिकारी कळकळीने बोलत होता.
 "आणि दुसरीचं काय ?" मी नकळत विचारले.
 "ती नखरेलपणाला आणि चैनीला चटावलेली खेड्यातली मुलगी आहे. ताई शिक्षणामुळे चांगले संस्कार होतात ही संकल्पनाच आता बदलावी लागणार बहुदा. खेड्यातली मुलगी १० वीला बरे मार्कस् पडले म्हणून बापाने तालुक्याला शिकायला ठेवली. पण मैत्रिणींच्या नादाने टी.व्ही. वरच्या झी, सोनी या चॅनेल्सचा धांगडधिंगा पाहायला चटावली. नको तो धीटपणा दाखवला, मग व्हायचे तेच

जगणे आणि शिक्षण/ १६७