पान:मनतरंग.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लाल दिव्याच्या सिग्नलपाशी आमची गाडी थांबली. लगेच गजरे विकणारी लहान मुले, सायंकाळची दैनिके विकणारी मुले गिऱ्हाइकांना गाठण्यासाठी त्या मोटारींच्या गर्दीतून भिरभिरू लागली. इतक्यात माझे लक्ष त्या चटपटीत मुलीकडे गेले. हातात गाडी पुसण्यासाठी मऊ फ्लॅनेलचा कपडा घेऊन गाडी पुसण्यासाठी ती पुढे आली होती. काळीसावळी, पाणीदार मासोळी डोळ्यात भरभरून काजळ घातलेले. झगझगीत नायलॉनचा ड्रेस. ओठ रंगवलेले मानेपर्यंत लोंबणारे झुम्मक झुलते डूल.
 "साब, एक मिनट मे कार चकाचक करदेती. सिर्फ दो रुपये, साब पढती हूँ मैं, नहीं मत कहेना..." "कौनसे. क्लास मे हो" मी प्रश्न विचारला आणि ती क्षणभर अडखळली. 'कौनसे स्कूलमे पढती हो...? सच जाती हो...?" पुन्हा माझा प्रश्न. मग मात्र तिनं माझ्याकडे काहीसे रागावून पाहिले. तिच्या हातात दोन रुपये पडले होते. ती दिसेनाशी झाली. तरीही माझ्या मनात मात्र रेंगाळत राहिली. हातात तान्हुलं घेऊन पोटासाठी भीक मागणाऱ्या बायका अशा लाल दिव्याच्या थांब्यापाशी नेहमी दिसतात. पण, भीक न मागता गाडी पुसून पैसे गोळा करणारी ही मुलगी. तरीही तिच्याबद्दलचा अविश्वास का मनात उगवला ?

मनतरंग / १६६