पान:मनतरंग.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणारेही भेटतात. पण मग असे का होऊ नये ? बालमजुरांना शिक्षण मिळावे, दोन वेळचे अन्न मिळावे, त्यांचे बालपण त्यांना अनुभवता यावे यासाठी प्राथमिक शाळेतील मुलांचे प्रबोधन करायला हवे. गाण्यांतून, गोष्टींतून, नाटुकल्यांतून. त्यांनी फटाके उडवणे कमी करावे, टाळावे आणि किमान दहा रुपये या 'बचपन बचाओ' जन अभियानाला द्यावे. तेरेदेस होम्स, युनिसेफ आणि अनेक स्वयंसेवी संस्था हे काम करतात. परंतु सर्व राष्ट्रांनी यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे.
 पंडित जवाहरलाल नेहरूचा जन्मदिवस 'बाल दिन' म्हणून साजरा करण्याची प्रथा पाळली जाते. ती हळूहळू रूढी बनू लागली आहे. आपणास दिसणारे बालमजूर, अनाथ मुलं, त्यांचे परिस्थितीमुळे होणारे शोषण पाहिल्यास असे समारंभ केवळ उपचारादाखल केले जातात हे लक्षात येते. ज्या मुलांच्या आयुष्याला आकार व आधार मिळायला हवा, ती मुलं स्वतःच्या चिमुकल्या हाताने आपली भाकरी मिळवतात व स्वावलंबनाचे धडे कोवळ्या वयातच गिरवायला शिकवतात. अशी मुलं खरं तर बालकदिनाच्या दिवशी कुठे तरी कामावर जुंपलेली असतात.
 जोपर्यंत बाल कामगारांचे प्रश्न काही प्रमाणात सुटणार नाहीत तोपर्यंत 'बालदिन' खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येणार नाही. पं. नेहरूंच्या जन्मदिनी आम्ही 'बालदिन' ठरावीक पद्धतीने एक 'विधी' म्हणून साजरा करतो पण तो खऱ्या अर्थाने कधी 'साजिरा' होणार?

■ ■ ■

...या ओल्या...करुण कडांचेही भान हवे!/१६५