पान:मनतरंग.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतातल्या चिमुकल्या खेड्यातील शाळेतल्या मुलाने आपल्या खाऊतली व फटाक्यातली बचत करून अकरा रुपये पाठवले तेव्हा ती रक्कमही अकरा कोटींएवढीच महत्त्वाची असते. पण असा विचार कोणी बोलून दाखवला की लगेच कोणीतरी शहाणपण शिकवते,
 "अहो, ही मदत नेमक्या लोकांपर्यंत पोचते का ? की मध्येच हडप-गडप ?"
 "अहो, या मंत्र्याच्या खिशात गेलेले कोट्यवधी रुपये आधी काढा नि मग सामान्य माणसांच्या भावनेला आवाहन करा. त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार नाहीत. लक्ष फक्त आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांवर !"
 एकूण काय, गेल्या काही वर्षांत आमच्या चालल्या आहेत. अनुकंपा... करुणा... वेदना... दुःख हे शब्द 'लेखात' वापरण्याइतकेच कार्यक्षम राहिले आहेत. एकूण जीवनच इतके 'फास्ट' वेगवान झाले आहे की, माणूस समोर येणाऱ्या क्षणातले सुखच फक्त पाहतो. हा क्षण, या क्षणातले सुख उपभोगले नाही तर जणू हातातून खूप काही निसटून गेले-हरवले अशी भावना माणसाच्या मनात येते. दिसणाऱ्या, हाताला...डोळ्यांना...कानांना स्पर्श करणाऱ्या सुखामागे माणूस लागला आहे. पण 'मना'चे काय ? मनाचेही सुख असते, समाधान असते, तृप्ती असते. ती मिळवण्याचा विचार करतो का आम्ही ?
 वर्तमानपत्रात बातमी वाचली. लातूर परभणी येथील तरुणांनी 'बचपन बचाओ' आंदोलनाच्यावतीने पणत्या घेऊन शोभायात्रा काढली. फटाके म्हणजे दिवाळीचा आनंद. किती मोठ्या आवाजाचा बॉम्ब उडवता, किती वेळ वाजत राहणारी फटाक्यांची माळ उडवली यावर दिवाळी किती जोरात साजरी केली याचे मोजमाप. फटाके तयार करण्याच्या अत्यंत धोकादायक व्यवसायात सर्वात जास्त बालमजूर काम करतात. अनेकांचे डोळे निकामी होतात, दारू हाताळल्याने कातडीचे रोग होतात, हे सारे का करायचे ? तर दोनवेळा भाकर पोटात जावी म्हणून. त्यात अवघे बालपण जळून-करपून जाते. म्हणून ते फटाके लोकांनी विकत घेऊ नयेत, घरातील लहान मुलांपर्यत या बाल मजुरांची व्यथा जावी म्हणून हे 'जनजागृती अभियान'.
 "अहो, जर फटाक्याचे कारखाने बंद झाले तर खाणार काय ते ? उलट फटाके भरपूर विकत घेऊन मुलांना मदत केलेली चांगली." अशी मखलाशी

मनतरंग / १६४