पान:मनतरंग.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खळखळ वाहणाऱ्या नदीच्या जळात पाय रोवून उभे राहायचे व पहाटे उगवणाऱ्या सूर्याला त्या निर्मळ पाण्याचा अर्घ्य ओंजळीत घेऊन वाहायचा. त्याला वंदन करायचे. जगण्याला आधार देणारे वृक्ष, नद्या, भूमी, डोंगर यांनाच आम्ही देवत्व दिले होते. मानवी विकासाच्या प्रवासात कधीतरी निसर्गात मुक्तपणे लहरणारे ईश्वराचे रूप आम्ही भिंतीत कोंडून टाकले. दगडात कोरले. अर्थात ईश्वराबद्दलची श्रद्धा भक्ताने कलेच्या माध्यमातून व्यक्त केली. त्या कलेचे अप्रतिम रूप मंदिराच्या उभारणीतून आजही जाणवणारे. सत्य आणि सौंदर्यातील शिवत्व पाहायला शिकवले नाही ते धर्मधुरीणांनी. 'ईश्वर' या संकल्पनेचा व्यवसाय सर्व स्तरांवर आणि सर्व स्तरांतील 'शहाण्यांनी' केला. ज्या राष्ट्रातील बत्तीस टक्के स्त्रिया 'सही' येणाऱ्या साक्षर असतात, ज्या देशातील पुरुष 'नोकरी'चे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहतात तेथे अंधश्रद्धांची बजबजपुरी न माजली तरच नवल ! मग आमच्या देवदेवतांना बकऱ्याचा अजाबळी लागणार, देवाला आजन्म सेवा करण्यासाठी मुली लागणार, मुलं लागणार. देवाच्या नावाने सामान्यांना लुबाडणारे असंख्य 'बुवा' निर्माण होतच राहणार !
 जीवन जगताना माणसासमोर असंख्य अडचणी येतात... जणू ती एक अडथळ्यांची शर्यतच असते. अशा वेळी सामान्य माणसाची मती गुंग होते. आपण किती अपूर्ण, असहाय आहोत याचे भान येते. अशावेळी आठवतो ईश्वर. ईश्वराच्या साह्याने संकटाशी सामना करण्याची ताकद, संकटाच्या पल्याड जाण्याची जिद्द मिळवण्याची भूमिका ठेवली तर ईश्वर या संकल्पनेतील 'सत्य' आपल्याला नक्की सापडेल. हे सत्य सामान्य माणसापर्यंत नेण्याची बांधीलकी खरे तर 'शिक्षणा'ने स्वीकारायला हवी. सुजाणांनी...शिक्षितांनी ठेवायला हवी. पण...

■ ■ ■

मनतरंग / १६२