पान:मनतरंग.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खायचा पदार्थ नाही हे पाहून फेकून दिली. पण आतल्या कागदांना... नोटांना हात लावला नाही. माकडांच्या माणूसपणाचे कौतुक करीत असतानाच माझी नजर दोन मुलींकडे गेली. त्यांचे वय तेरा ते पंधराच्या दरम्यानचे असावे. डोळ्यात बालपण होते पण शरीरावर तरुणाईची झळाळी चढू लागलेली. कपाळ मळवटाने भरलेले. अंगावर कोऱ्या हिरव्या साड्या. हातभरून लाल-हिरव्या बांगड्या आणि केस?...ते मात्र जटा झालेले .चिप्प चिकटलेले केस. त्या नक्कीच देवदासी होत्या. रामलिंगाचा डोंगर आहे.डोंगरावर देवीचा निवास असतो. त्या दोघींनी येडेश्वरीचे दर्शन घडवून रामलिंगाचे दर्शनासाठी आणले असावे. त्या दोघींना पाहून मन थरारून...वैतागून गेले. स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली तरी अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या या प्रथा समाजात जिवंत आहेत. मी त्यांना भेटून काही विचारणार तोच सारेजण जीपमध्ये बसले नि निघून गेले. कहर म्हणजे बरोबर एक पोलीस होता.
 नेपाळमधून फार मोठ्या प्रमाणावर लहान मुलींची निर्यात वेश्या व्यवसायासाठी होते. हे दुःख एकूण सर्वच आशियाई देशांचे आहे. गेली अनेक वर्षे देवदासी प्रथेविरुद्ध परिवर्तनवादी कार्यकर्ते जीव झोकून काम करीत आहेत. परंतु अजूनही सौंदत्तीच्या डोंगरावर...आसपास ही प्रथा आहेच ! आणि मुली देवाला वाहण्यामागचे प्रमुख कारण मुलासाठी बोललेला नवस हेच असते. आज विज्ञानाने सिद्ध केले आहे की मुलगा वा मुलगी होणं स्त्रीवर अवलंबून नसतेच. पण हे विज्ञान...त्याने सिद्ध केलेले सत्य ग्रामीण भागात राहणाऱ्या सत्तर टक्के समाजापर्यंत नेणार कोण ? शिक्षणाने मनाची...तर्कबुद्धीची कवाडे उघडतात, माणूस कार्यकारणभाव जाणू लागतो असे मानले जाते. परंतु शिकली सवरलेली माणसे अधिकाधिक 'सकामश्रद्ध' 'अंध' होत चालली आहेत. गणेश दूध पितो, तेही शासकीय कार्यालयात मांडलेला बाप्पा. सत्यसाईबाबांवरील श्रद्धेने त्यांना प्रथम अर्पण केलेली 'कला' दूरदर्शनवरून दाखविली जाते. श्रद्धा 'निष्काम' राहिलेली नाही. तशी ती नव्हतीही. सकाम श्रद्धेतून नवससायास आले. सकाम श्रद्धेचा प्रवास अंधश्रद्धेकडे जातो. प्रतिष्ठित, उच्चशिक्षितांनी तरी आपल्या श्रद्धेचे प्रदर्शन मांडू नये. परंतु आज कोणत्या ना कोणत्या 'महाराजा' ना आपण गुरुस्थानी मानले आहे हे सांगण्यात प्रतिष्ठा आली आहे.
 ईश्वराची निष्काम... निरंग... निर्विकार श्रद्धा कधीही निराकार असते. ती स्वयंभू असते. आमच्या पूर्वजांनी अशा श्रद्धेची बीजे आमच्या जीवनात पेरली.

ईश्वर, सत्य... आणि शिक्षण / १६१