पान:मनतरंग.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मंत्र यांची रचना केली. आजही 'आसेतुहिमाचल' आणि 'द्वारका ते जगन्नाथपुरी' यांच्या दरम्यान पसरलेल्या, विविध भाषा…वेशभूषा यांनी विनटलेल्या भारतातील लोकपरंपरा व लोकजीवनांचा शोध घेतल्यास लक्षात येते की, आमची व्रते, सण, विधी, उत्सव यांत विलक्षण एकात्मता आहे.
 ज्येष्ठाच्या उत्तरार्धात आभाळाचा निळा रंग कधी झाकोळून जातो ते कळत नाही. आकाश काळ्याभोर उद्दाम ढगांच्या खिल्लारांनी भरून जाते. झुंडीच्या झुंडी दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने पळत असतात. भर दुपारी अंधारून येते. सूर्यालाही ग्लानी येते. मग विजांचा चमचमाट आणि एकापाठी एक कोसळणाऱ्या पावसाच्या धटिंगण सरी. अशावेळी अगदी नवे घरसुद्धा ठिबकायला लागते. मग चंद्रमोळी घरात रहाणाऱ्यांचे हाल तर विचारायलाच नकोत! आपल्याही ओठांवर इंदिरा संतांच्या ओळी बरसू लागतात -

नकोस नाचू तडातडा
असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली,
आणू भांडी मी कोठून…?
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली…"

 असा हा पाऊस भारतात भर उन्हाळ्यानंतर येतो. तो सर्वांनाच हवाहवासा असतो. त्यातूनच अवघ्या जगाची भूक शमवणारी अन्नदा-कृषिलक्ष्मी शेताभातातून बहरणार असते. झाडे हिरवीगार होऊन फुलाफळांनी लखडून जाणार असतात. या ऋतुमुळे धरणी सुफला… संपन्न… परिपूर्णा होणार असते.
 मनातील भावना, कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर रीत म्हणजे ऋतूंशी जोडलेली सणव्रते, विधी…आदी परंपरा.

 ज्येष्ठात वटवृक्षाची पूजा भारतभर केली जाते. तर आषाढात रानात उगवलेल्या बाभळींची, झाडांची पूजा लेकरंबाळं घेऊन जाऊन करण्याची प्रथा सर्वत्र आहे. झाडाखालील दगडालाच हळदीकुंकू वाहून लक्ष्मी करतात. कणकेत

मनतरंग /८