पान:मनतरंग.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शिवशंकराची देवस्थाने डोंगरात, हिरव्या राईने बहरलेल्या निवांत, शांत ठिकाणीच बहुधा असतात. डोंगरदऱ्यात रमणाऱ्या या 'शिवा'ला भुलवण्यासाठी पार्वतीलाही भिल्लिणीचे रूप घ्यावे लागले होते. धबधब्याच्या पायथ्याशी गारवा अंगावर घेत माकडांच्या संगतीत राहणाऱ्या रामलिंगबुवांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही मैत्रिणी गेलो. मी देवळातल्या ईश्वरावर भरोसा न ठेवणाऱ्यांपैकी आहे. पण निसर्गातल्या विविध लीलांमधून आपली झलक दाखवणारी ती गूढता 'त्या' च्या विशाल अस्तित्वाची साक्ष देते. मैत्रिणींच्या श्रद्धेचा सन्मान...आदर ठेवून मी त्यांच्या सोबत हिंडत असते.
 मैत्रिणी नारळ, फुलं घेण्याच्या गडबडीत. मी खाली उतरून धबधब्यातून पडणाऱ्या पाण्यात पाय बुडवून उभी राहिले. यंदा पाऊस मन भरून झालाय. त्यामुळे भवतालचे डोंगर गर्द हिरवे झाले आहेत, तरालेल्या चिंचा...कवठांवर वाकड्या चिंचा नि कवठे लटकू लागली आहेत. या डोंगरात माकडेही गर्दी करून राहतात. आपल्या हातातली वस्तू झडप घालून पळवणे हा त्यांचा लाडका उद्योग. मग नारळ असो वा पर्स. त्याचा हिसका मैत्रिणींनाही बसला. एकीच्या खांद्यावर बसून त्याने पर्स पळवली. देवळाच्या भिंतीवर बसून ती उघडली. त्यात

मनतरंग / १६०