पान:मनतरंग.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेल्या वर्षी याच काळात घनघोर पाऊस झाला होता. दणादण कोसळणारा. पण त्यांची पावलं जमिनीला उद्ध्वस्त करणारी...जखमा करणारी होती. त्या भयावह पावसाकडे पाहत बालाजी ड्राईव्हर म्हणाला होता, "भाबी हा लोखंड्या पाऊस हाय. याने जमीन कडक होणार. शेतीला मारक हाय हा पाऊस. याला लोखंड्या हस्त म्हणतो आम्ही. यंदा जवारी, कर्डई कमी येणार. हायब्रीडवरच पोट भागवावं लागणार !"
 हस्ताचा पाऊस आणि निरभ्र होत जाणारे नवरात्राचे चांदणी आभाळ यांचे जवळचे नाते आहे. लहानपणी हस्तनक्षत्र लागले की पुणेकर मैत्रिणींकडे हादगा मांडायची धांदल उडे. आम्हा खानदेशवासींची लाडकी माहेरवाशीण भुलाबाई मात्र अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद पुनवेला पतिराज भुलोबा आणि गणेशबाळासह महिनाभर मुक्कामाला येई. आमच्या वर्गात सांगलीची एक मुलगी होती. नवरात्राच्या पहिल्या माळेच्या दिवशी तिच्या घरी भोंडला मांडला जाई.
 भाद्रपद आश्विनातले ते दिवस आम्हा मुलींच्या स्वप्नात ज्येष्ठ आषाढापासून येत.

"ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडून दे,करीन तुझी सेवा...

यादवराया राणी रुसून बैसली कैशी ?

भाद्रपदाचा महिना आला
आम्हा मुलींना आनंद झाला"

 अशी अनेक गाणी गुणगुणण्याचे खूळ आम्हाला लागे, टिपऱ्या नाही तर टाळ्यांच्या तालात भिरभिरणारे फेर, मोकळ्या आकाशाखाली उंच आवाजात गायलेली अंगणातली गाणी आणि त्यानंतर प्रसाद ओळखण्याचा कार्यक्रम. तो चमचाभर खमंग प्रसाद आजही जिभेवर काटा फुलतो.
 भोंडला, हादगा, भराडी गौर, भुलाबाई हे उत्सव कुमारिकांचे. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत खेळले जाणारे उत्सव नावाने वेगळे असले तरी त्यांचा मूलबंध एकच आहे. कुमारिकांच्यातील सुफलन ऊर्जेचा सन्मान करणारे हे उत्सव आहेत. त्यांची गाणीही एकाच प्रकारची आहेत. मला लहानपणी नेहमीच प्रश्न पडे. भुलाबाई वऱ्हाड-

मनतरंग / १५८