पान:मनतरंग.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 परवा दिवसभर चांगले उत्फुल्ल उन्ह पडले होते. झळझळीत रंगाचे. जणू सूर्यफुलांचे शेत झुलतेय. पाहता पाहता उन्हं कधी आणि कुठे हरवली ? ते कळलेच नाही. मग फक्त गडगडाट, उरात धडकी भरवणारा. घनगंभीर लयीतला आणि लगेच हत्तीच्या सोंडेतून वेगाने उडणाऱ्या धरणीला आकंठ भिजवणाऱ्या धारा, उन्मुक्त पावसाच्या. बेभान वाऱ्यासंगे वाकड्या तिकड्या नशेत धावणाऱ्या. हे दृष्य पाहाताना मला लहानपणीच्या नाचाच्या ओळी आठवल्या.

"आसुसली माती
पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ती आता,
पाऊस पाड गा, पाऊस पाऽड..."

 मी 'कालनिर्णय'कडे धावले. त्याच दिवशी हस्तनत्रक्ष लागले होते. कितीतरी वेळ तो निळा धुंद पाऊस मी अनिमिष नजरेने न्याहाळत होते. सुरुवातीला बेभानलेली लय आता संथ झाली होती. पण पावसाचा वेग आणि घनदाट पोत तसाच होता. पावसाच्या स्पर्शातून कळत होते की, हा पाऊस लोखंड्या नाही.

यशस्वी होण्यासाठी.../१५७