पान:मनतरंग.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नि भडक प्रेमाचा. आता पोरगी देखणी असेल तर एकाच का गावातल्या अनेक मुलांना वाटतं की हिचं प्रेम आपल्यावरच बसावं आणि ती बिचारी असते अभ्यासात नाही तर मैत्रिणीत दंग. तिने अशा प्रेमाला साथ दिली नाही की झाली रिंकू पाटील, नाही तर अमृता देशपांडेची गत" एका डी.एड. च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलीने मन मोकळे केले.
 "भाबी, आम्हाला वाटायचं की स्त्रीमुक्ती म्हणजे बाया-पुरुषापेक्षा वरचढ आहेत. त्यांनी संसार मांडू नये, घरात लक्ष देऊ नये. त्यांनी कसंपण वागावं...असे विचार. पण आज जरासं डोक्यात बसलंय की जग ना पुरुषाचं, ना बायांचं. दोघे एकत्र आले तर जगाचा गाडा पुढे चालणार. दोघांनी एकमेकांना सहकार्य करावं, एकमकांना मान द्यावा...पन तरीही येवढ्या चर्चेने काही डोक्यात फिट्ट बसणार नाही हा विचार ! दोन-तीन वेळा तरी चर्चा हवीच' एका प्रौढ तरुणाने सूचना केली. तेवढ्यात गावातली एक तरुण सून उठून बोलू लागली.
 "ताई, आता बायांना ग्रामपंचायतीत तीस टक्के जागा आहेत. मला उभं रहायचं होतं. छोटीच्या बाबांची पण परवानगी होती. मी राज्यशास्त्र घेऊन एम.ए. झालेय. पण सगळ्यांनीच वेड्यात काढलं मला. बाया कुठे राज्य करतात का ? इंदिरा गांधीची बात वेगळी. ती देवीमाय होती. असं गावातली, घरातली माणसं म्हणायची...तुमी बघा, सरकारनं कायदा केला तरी सगळ्या पन्नाशीच्या आगेमागे असलेल्या बायांनाच निवडणुकीत उभे करतात."
 ...पाहता पाहता चर्चेत दोन तास गेले. प्रत्येकाच्या मनात उलट्यासुलट्या विचारांचे वादळ सुरू झाले होते. पण नव्या दिशेची ती चाहूल होती !!

■ ■ ■

मनतरंग / १५६