पान:मनतरंग.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता चर्चा होईल, पुरुषांनी जायला हरकत नाही.
 "असं कसं ? आमच्या मनात पण शंका हायेत. आमी पण चर्चेत भाग घेणार" मला हटकणारा तरुण म्हणता होता. "तुमी म्हणता बाई नि पुरुषांचा जलम सारखाच. दोगं पण मायच्या पोटात नऊ महिने काढणार. रोगपण सारखे. मरण पण सारखं. आतापर्यंत आमाला पण वाटायचं की बाईची अक्कल चुली पसवर. मी कॉलेजात गेलो तवा खोली करून ऱ्हायलो. होस्टेलात राहण्याइतका पैसा न्हवता, चार मित्रांनी खोली केली. माय घरून चटणी, लोणचं द्यायची. पण भाकर करायला तवाच शिकलो, नि कळलं की भाकर थापणं नि ती तव्यावर फिरवणं लई अवघड हाय...मग मायच्या हातची टम्म फुगलेली भाकर आठवायची." "तुम्ही म्हणता ते खरंच आहे. अवं खाण्यासाठी यंत्रावर शेंगा फोडून सोले काढणं जमतय. पण शेतात भुईमूग पेरायचा तर घरातल्या बायांनाच शेंगा सोलाव्या लागतात. तरच दाण्याचं नाक शाबूत ऱ्हातं त्यातूनच अंकुर फुटतो" दुसऱ्याने पुस्ती जोडली.
 "आमचे आजोबा सांगायचे, त्यांची माय पहाटे उठून दळण दळायची. तवा कुठे भाकर खाया मिळायची. डाळीसाळी करणं, केरवारे, सारवणं...सारं बायाच करीत" तिसरा बोलला. तरुण मुलं बोलत होती. तेवढ्यात एका प्रौढेनं त्यांना सवाल केला "पण या कामाला किंमत दिली का तुम्ही ? भाबीसारख्या बाया, ज्या हपिसात जातात, महिन्याला नोटा मिळवतात त्यांच्या कामाला किंमत. आम्ही घरात राबतो, शेतात राबतो. पण कोनी म्हंत का ? की बाई दमलीस. खिनभर इसावा घे..."
 "खरंय भाबी तुमचं. आमच्या कामाला बी किंमत मिळाया हवी. पैसा द्या म्हणत नाय आमी, पण निदान दोन गोड शब्द तरी मिळावेत की. लगीन झाल्यावर दोन लेकरं होइस्तो लाड. मग हायेच वाकड्या बोलाचा नि बुक्क्याचा मार..."
 'भाबी, मी बी सुनेबरुबर आल्ये हितं. मला वाटलं काय पोरींच्या मनात भलतंसलतं भरवून देता तुम्ही, पन मला समदं पटलं. आमच्या मालकाला आमची किंमत नाय कळली. पन पोरावांना तरी समजावी. त्यांनी तरी मायला-बायकुला इसावा द्यावा." तिच्या बोलण्याला दुसरीने साथ दिली. "मॅडम, टी.व्ही.वरच्या मालिका पाहिल्या का तुम्ही ? सगळ्यात एकच विषय. पोरा-पोरींच्या चहाटळ

नव्या दिशेची चाहूल होती ती... / १५५