पान:मनतरंग.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 स्त्रियांचे प्रश्न सोडवायचे असतील, त्यांच्यावर होणारे अत्याचार कमी करायचे असतील तर स्त्रीमुक्तीची दिशा, तिचे संदर्भ तरुणांपर्यंत, पुरुषांपर्यंत पोचवायला हवेत. स्त्रियांच्या प्रश्नांवर बोलायचे आणि तेही स्त्रियांसमोर ? मला हे पटत नसे. किंबहुना माझा हा हट्ट असे, की मी व्याख्यानाला येईन. पण श्रोत्यांत स्त्री पुरुष दोघेही हवेत. ग्रामीण भागात राष्ट्र सेवा दलाच्या वतीने युवासंकल्प शिबिरे घ्यायची होती. खेड्यातील तरुणांना माझी ही भूमिका फारशी भावली नाही.
 "भाबी, बायांच्या समस्या बायांनाच कळाया हाव्यात. आम्ही बाप्ये कशाला मध्ये हवे ? अन् बायांना तरास देणाऱ्या सासवा नि नणंदा बायाचा की!" एका तिशीतल्या तरुणाने मला हटकले.
 "दादा म्हंतत त्ये खरचं हाय. बायांच्या समस्या बायांपुढेच मांडा. 'ग्रामीण' इकासाची दिशा, या विषयावर दुपारी भाषण आणि चर्चा हाये तवा आमी येतो" दुसऱ्याने पुस्ती जोडली. त्यांची भाबीपण हट्टी. मी विनंती केली,
 "हे बघा, माझ्यासाठी - तुमच्या भाबीसाठी घंटाभर येऊन ऐका. पटलं नाही तर चर्चेत नका भाग घेऊ" आणि माझे भाषण सुरू झाले. अर्धा पाऊणतास झाला तरी कोणी उठून गेले नाही. माझी मांडणी संपली आणि मी सांगितले की,

मनतरंग / १५४