पान:मनतरंग.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या लेकीच्या मागे कामभावनेने धावणारा ब्रह्मा आम्ही लक्षात ठेवत नाही तर निर्मितीच्या तत्त्वाचा उद्गाता ब्रह्मा आम्ही आदर्श मानतो...सत्यवचनी हरिश्चंद्र, त्याच्या सत्यवचनांना साक्षात् करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारी तारामती, असे हे अनेक आदर्श आपल्या पूर्वजांनी वागण्यातून निर्माण केले; म्हणून आज आम्ही आमची संस्कृती श्रेष्ठ! असे म्हणू शकतो. पण आणखीन दोन-चारशे वर्षांनंतर आमच्या भावी पिढ्यांना 'आमची संस्कृती श्रेष्ठ आहे' असे सांगण्याची संधी आपण देणार आहोत की नाही ? आज कोणतेही वर्तमानपत्र चाळा, त्यात स्त्रियांवरील अत्याचार, पैसा वा सत्ता यावरून होणारे खून, तरूण मुलींवर होणारी बळजबरी... त्यामुळे त्यांच्या कुटुंब प्रमुखाने वा कुटुंबानेच केलेल्या आत्महत्या, लहान बालकांना वेठीस धरून केलेला छळ... यांच्या बातम्यांनी पाने भरलेली असतात. किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या 'मोठेपणा' च्या बातम्यांनी. मुंबई म्हणजे नंबर दोन वाल्यांची नगरी ! अशी व्याख्या आज रूढ होऊ पाहते आहे.
 पूर्वी संतापुढे राजा झुकत असे, सर्वांगीण चारित्र्य हे श्रेष्ठ मानले जाई. तुकारामाना भेटण्यासाठी जाणता राजा शिवाजी महाराज वेश बदलून कीर्तन ऐकण्यास गेले. मीराबाईचे दर्शन अकबरासाख्या मोगल सम्राटाला घ्यावेसे वाटले. पण त्यासाठी वेश बदलून जावे लागले.

"जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधु ओळखावा,
देव तेथेचि जाणावा ॥"

 असे श्रद्धेने जगणाऱ्यांची परंपरा अखंडपणे या देशात होती म्हणून 'भारतीय संस्कृती' हा शब्द उच्चारताना आजही आमची मान ताठ होते. हे भाग्य उद्याच्या पिढ्यांना आम्ही देणार ना? की 'पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ' या ओळी नुसत्या आळवीत बसणार?

■ ■ ■

उद्याच्या पिढ्यांना ते भाग्य देणार ना आम्ही?/१५३