पान:मनतरंग.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "आम्ही ऐकलंय की रुपकुँवर नावाच्या तरुण मुलीला मृत नवऱ्याबरोबर जाळून टाकले. नवरा मेला तर बायकोलाही त्याच्याबरोबर जाळतात म्हणे ! खरंय हे ? बायकोला केव्हाही नवरा घराबाहेर हाकलून लावतो, तिला मारतो, जाळतो असंही ऐकलंय खरंय हे ? छोटी छोटी मुले मजुरी करतात...शाळेत जात नाहीत. या मुलांनी मजुरी केली नाही तर त्यांना जेवण मिळत नाही..." असे प्रश्न ऐकून मला खूप वाईट वाटले. पण माझ्याजवळ उत्तरही नव्हते. एक छोटा सहावीतला मुलगा मला गंभीरपणे विचारत होता, 'गालिचा तयार करण्याच्या आणि फटाक्याच्या व्यवसायात तर आठ ते बारा वर्षांची मुलेच असतात. मला खूप वाईट वाटलं हे वाचून ! तुम्ही पण लहानपणी मजुरी केली?" हा प्रश्न ऐकून मी थक्कच झाले. "सर्वच मुले बालमजुर नसतात... थोड्या गरीब मुलांनाच काम करावे लागते वगैरे सांगत मी विषय बाजूला नेला...हे मी त्या शिक्षकाला सांगितले, पण याचे म्हणणे एकच; भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे तुम्ही पटवले की नाही त्यांना?
 मग नाइलाजाने मी प्रश्न टाकला. संस्कृती म्हणजे काय ? आपला आहार, सणवार, राहण्याची... पोशाखाची पद्धती, आपली महाकाव्ये, तत्त्वज्ञान, विचारांची धारा, आम्ही एक एक यादी करीत होतो. विविधतेतील एकात्मता वगैरे सगळे मुद्दे एकत्र केले. पण परत एक सवाल मी टाकला.
 "मग ही संस्कृती एका रात्रीत निर्माण झाली ?"
 "आपल्या पूर्वजांनी निर्माण केली" उत्तर आले.
 "किती वर्षांत निर्माण केली ?" 'घर बांधूया' असे म्हणत घर बांधतो. पण आता संस्कृती निर्माण करूया" असे म्हणत ती निर्माण करता येते का ?" माझा प्रश्न.
 "नाही" सामूहिक उत्तर.
 "अप्रियमपि सत्य:च वक्ता श्रोताच दुर्लभः । हे वचन म्हणजे अनुभवातून अकारलेले सत्य आहे. अप्रिय असलेले सत्य मान्य करणारा श्रोता दुर्मिळ आणि अप्रिय असलेले सत्य समाजासमोर मांडण्याचे धाडस करणारा वक्ताही दुर्मिळ. राम सत्यवचनी होते, श्रीकृष्णांनी निष्काम कर्मयोग सांगितला. द्रौपदी...राधा, रुक्मिणी, मीरा यांच्यावर प्रेम करीत प्रेमाच्या विविध छटा साकार केल्या.

मनतरंग / १५२