पान:मनतरंग.pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 मानवी संस्कृतीच्या विकासात 'माणूस आणि निसर्ग' यांच्यातील अनुबंध सर्वात पुरातन...सनातन आहे. निसर्गाच्या विविध विभ्रमांनी त्याला भय आणि आनंद या दोन्ही परस्परविरोधी संवेदनांचा अनुभव दिला. प्रचंड वेगाने सुसाट धावणारी वादळे, मुसळधार पाऊस, अंग अंग भाजून टाकणारे ऊन यांचा अनुभव भयचकित करणारा. तर, ऊनाच्या कहारानंतर रिमझिमणाऱ्या सुगंधी सरी, ऐन उन्हाळ्यात दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या गंधगार लहरी आणि कडाडत्या थंडीत अंगभरून पांघरावीशी वाटणारी उबदार उन्हे, यांचा अनुभव मनात आंनदाच्या लहरी उठवणारा.

 निसर्ग आणि माणूस यांच्यातील अतूट नात्याच्या विविधरंगी विकासाच्या खुणा आजही आमच्या सण, उत्सव, व्रते यांतून दिसतात. भारतीय संस्कृतीत भूमीला विश्वाचा गर्भाशय मानले आहे. बीज पेरणारा सूर्य असतो. परंतु पाऊस कोसळला नाही तर बीज कोरडे राहते. ते रुजत नाही. भूमीचा गर्भाशय वांझ राहतो. म्हणून वर्षा, सूर्याची ऊर्जा आणि भूमी या तिहींच्या समागमातून वनस्पतीसृष्टी विकसित होते याची जाण आदिमानवाला निसर्गाच्या निरीक्षणातून आली आणि त्यातूनच मानवाने 'अन्नसमृद्धी' शी जोडलेली व्रते, विधी, आचार,

'वृक्षपूजा...' पाऊसकाळाचे स्वागत /७