पान:मनतरंग.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 आजकाल पुरस्कारांची चलती आहे. पूर्वी शासन, समाजसेवी संस्था, विविध प्रतिष्ठाने यांच्याद्वारे विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवेसाठी तसेच समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींना, संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जात. परंतु अलीकडे गणेशोत्सव, नवरात्र आदी उत्सवांच्या निमित्ताने गल्ली - गावातही पुरस्कार वाटले जातात आणि त्यासाठी जात-पात-धर्म आपलेतुपले, नाती-गोती या अनुसार निकष लावले जातात. त्यामुळे पुरस्कार या शब्दाला गुळमुळीतपणा येऊ लागला आहे.
 हे तर खरेच की, पुरस्कारामुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढून काम करण्याची प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो. पण अलीकडे पुरस्कारांचे आगळेपण, त्यातील तेज लोपू लागलेय.
 पूर्वी हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्या व्यक्तीला ही बातमी कळत असे. पुरस्कारासाठी व्यक्ती निवडताना विशेष काळजी घेतली जाई. त्या व्यक्तीबद्दलची माहिती त्या परिसरातील सन्माननीय व्यक्तींकडून प्रत्यक्ष भेटीतून गोळा केली जात असे. त्या व्यक्तीचे काम पाहिले जात असे. पण आज एक नवीनच पद्धत रूढ होऊ पाहात आहे. त्या व्यक्तीने प्रश्नावली भरून द्यायची. त्या

पुरस्कारांची कहाणी / १४५