पान:मनतरंग.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ती चाहूल असावी. राजाराणीच्या आणि पऱ्यांच्या राज्यात रमणारे मन. फडके, खांडेकर, विभावरी शिरूरकर, गोनिदांच्या कादंबऱ्या; बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा, पद्मा यांच्या कवितांत रमू लागले. गंगाधर गाडगीळांची बिन चेहऱ्याची संध्याकाळ स्वप्नात येऊ लागली आणि ऑगस्टचे आगळेवेगळेपण मनाला वेढू लागले. 'स्वराज्य' हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. असे ब्रिटिश शासनाला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक आणि ऑगस्ट यांचे नाते कळू लागले. 'चले जाव' चळवळीचा उठाव, 'भारत छोडो' चा महात्माजींनी दिलेला नारा, बाबू गेनू...शिरीषकुमार यांसारख्या हजारो वीर वीरांगनांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान आणि सोसलेल्या यातना या सर्वांचा नऊ ऑगस्टशी असलेला अनुबंध लक्षात येऊ लागला आणि कवितातल्या शब्दांचे अन्वयार्थ मनासमोर उलगडू लागले. शेकडो कविता जीवनाला नवे संदर्भ देऊ लागल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला' असे आर्तपणे आळवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तळमळणारा आत्मा आणि सागराच्या जिथल्या तिथे रिचणाऱ्या उत्तुंग... अस्वस्थ लाटांचे एकात्म पण त्याच काळात उमगले. साठीच्या उंबरठ्यावरचा श्रावण जेव्हा दारात येतो, तेव्हा असे अनेक श्रावण मनात तरंग उठवीत जातात. त्या श्रावणांपेक्षा हा श्रावण काही वेगळा आहे का ? छे, मुळीच नाही. श्रावण नेहमीच हिरवा... गंधगारवा देणारा असतो. मग आपोआप ओठावर ओळी येतात.

"आठवणींचे रंग ताजे
साठीच्या उंबऱ्यात ओठी
श्रावण गीत बिराजे..."


■ ■ ■

आठवणींचे रंग सावनी/ १४१