पान:मनतरंग.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिवाला सलाम ठोकून थेट घराच्या ओढीने परतायचे. जिना चढताना कढीचा खमंग वास, मेथीच्या मुद्दाभाजीची फोडणी...सारे नाकात झणझणायचे. मग थकलेले पाय सरसर जिना चढत.
 श्रावण आला की, आम्ही मैत्रिणी कुणाकुणाच्या घरी बहीण नाहीतर वहिनीची मंगळागौर आहे, याची यादी करीत असू. किमान दोन मंगळवारी तरी जागरणे हवीतच. मग तऱ्हेतऱ्हेच्या खेळांचा दंगा. त्यावरून भांडणे, तव्यावरची फुगडी, बसफुगडी अशी फुगड्यांची चढाओढ. सूप नाचवतानाची धांदल. फक्त मजा... मजा... आणि मज्जाच. उखाण्यांतून एकमेकीवर केलेल्या चढाया. ही सारी धमाल म्हणजे श्रावण.
 मंगळागौरीची सजावट हा तर खास अमचा प्रांत. मंगळागौर कुणाची का असेना, पण वेगवेगळ्या आकाराची...रंगाची फुले आणि पाने गोळा करण्यासाठी अख्खे गाव पालथे घालायचे. पानाफुलांच्या विविध आकारांनी मंगळागौरीच्या चौरंगाभोवती गालिचा विणण्यातला आनंद आगळाच असे. श्रावण आला की, कोपऱ्यावरच्या दुकानात श्रावणाचे रंगीत कागद विकायला येत त्यातला छान रंगाचा कागद आणून भिंतीवर उत्साहाने चिकटविण्यात येई. त्यावर बुधबृहस्पती, जिवती, शिवपार्वती, नागनरसोबा, नृसिंह यांची चित्रे असत. बुधवारी बृहस्पतीची पूजा, शुक्रवारी जिवतीची पूजा होईच. श्रावण म्हटला की मेंदी आलीच. मेंदीची झुडपं आषाढ अंगावर झेलून अक्षरश: पिसारून जात. मेंदीचे काटे श्रावणात रेशमी होतात. झग्याचे खिसे...परकराचे ओचे भरभरून मेंदीची पाने आम्ही घरी घेऊन यायचो. मग ती वाटण्याचा घाट, त्यात घालायला चिमणीचा गू गुपचूप आणून त्यात टाकायचा. मेंदी लालचुटुक रंगते म्हणे त्याने. घराच्या मधल्या चौकात भलामोठा धुण्याचा दगड असे. त्यावर मेंदी जोर लावून बारीक वाटीत असू आणि ती वाटतानाच हात लालचुटूक होऊन जात. मग कष्टाने वाटलेला हिरवा गोळा शेजारच्या मैत्रिणीला देताना जीव कासावीस होत असे. श्रावणभर मुलींचे हात मेंदीने रंगलेले आणि केस फुलांनी बहरून गेलेले, आज ते दिवस आठवले की पुन्हा आठवतात बालकवी. "सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती..." फुलं गोळा करणाऱ्या पोरीसोरी जणू फुलमाळाच !!
 पाहता पाहता नववीत कधी आलो ते कळलेच नाही. डोळ्यातली कोवळी झळाळी जाऊन तिथे एक वेगळीच चमक आली. तरुणाईच्या उंबरठ्याची

मनतरंग / १४०