पान:मनतरंग.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आम्ही स्त्रियांनी आमच्या मुलींना युद्धशास्त्राचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. एन.सी.सी.त मुली जातात. बंदूक चालवायलाही शिकतात. पण त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास पुढे संसार करताना, भाजी-आमटी फोडणीला टाकताना किंवा दहा ते पाच 'चाकरमानी' करताना गळून जातो. असे का व्हावे? संसार करणे ही बाब दुय्यम नाही. संसार नेटका करायचा असेल तर डोळ्यांचे सूर्य करावेच लागतात. स्त्रीचे डोळे तर जन्मत:च चंद्राप्रमाणे शीतल, स्नेहल असतात पण ही शीतलता प्रसंगी अग्नीचे तेज धारण करणारी असावी लागते.
 स्त्री ही मुळातच भाविनी आहे, अग्निकन्या आहे आणि मनस्विनी आहे. परंतु काळाच्या ओघात तिच्या 'भाविनी' या रूपालाच महत्त्व दिले गेले. त्या रूपाला त्याग, सहनशीलता यांचे लेप चढवले गेले. तिच्या व्यक्तिमत्त्वातील मनस, अग्नी यांच्यावर, अविद्या... अंधश्रद्धा... आत्मघृणा... आत्मसंभ्रम यांची राख साठली आहे. राजाराम मोहन राय, महर्षी दयानंद, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेक महामानवांनी स्त्रीचे माणूसपण जाणले. तिच्यातील माणूसपण जगावे, यासाठी शिक्षणाची दिशा मोकळी करून दिली. दीडशे वर्षांच्या वाटचालीतून आज स्त्रीला आत्मभान आले आहे. तिने जाणले आहे की, हे जग स्त्री-पुरुष दोघांचे आहे.
 समाजाचे प्रश्न, राष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी दोघांनी पुढे यायला हवे. भविष्यात वेळच आली तर भारतीय स्त्रिया रणांगणातही मागे राहणार नाहीत. त्या एकमुखाने सांगतील,

"कोटी कोटी वीर पुरुष
समरवेश धारी
राहतील मागे का भारतीय नारी ?
समय बिकट येता
मानसात दिवस रात्र एक हा विचार हो
राहतील मागे का भारतीय नारी ?"


■ ■ ■

मनतरंग / १३८