पान:मनतरंग.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्ञान, जाण त्यात नसे. दुसऱ्या महायुद्धात अनेक स्त्रियांनी राष्ट्ररक्षणासाठी आपली बुद्धी, कला, सौंदर्य यांचा उपयोग, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी केला होता. गुप्तहेर खात्यातील स्त्रियांचे महत्त्व आर्य चाणक्यापासून मान्य होते.
 २१ व्या शतकात प्रवेश करणारी स्त्री युद्धशास्त्रात प्रावीण्य मिळवू लागली आहे. नौदलात, विमानदलात स्त्रियांना प्रवेश दिला जातो. पोलिस विभागातील त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे. किरण बेदी, मीरा बोरवणकर, श्रीदेवी गोएल यांच्या जोडीला आता नव्या तरुणी आत्मविश्वासाने या क्षेत्रात येत आहेत.
 चारएक वर्षांपूर्वीचा अनुभव. आम्ही पुणे-बेंगलोर प्रवास अवकाशमार्गाने... विमानाने करणार होतो विमानचालक आणि दिशानिर्देक या दोघी महिला आहेत हे पाहून भोवताली कुजबूज सुरू झाली.
 "आज काही आपलं खरं नाही. नॅव्हिगेटर आणि वैमानिक दोघी स्त्रिया दिसताहेत." दोन पुरुष प्रवाशांतला संवाद.
 "अरे बाबा, बायकांचं राज्य खऱ्या अर्थाने आलंय हं."
 "बघा हो, आज तुमचे जीव आमच्या ताब्यात आहेत." एका पत्नीचा गोड टोमणा !
 "कलियुग है बाबा. आँखे बंद करके जीना..."
 कॅप्टन सौदामिनी देशमुख यांनी आम्हाला सुखरूपणे आणि अलगदपणे बंगलोरच्या धावपट्टीवर उतरवले.
 मी न राहवून त्या प्रवाशांना विचारलेच, "सुखरूप उतरवलं ना विमान महिलांनी ? पुरुष वैमानिकांपेक्षा कुठे कमी पडल्या नाहीत ना त्या ?"
 दूरदर्शनवरील फ्लाईट लेफ्टनंट अनिता आपटेला पाहताना बंगलोर प्रवासाची याद आली.
 कारगिलच्या परिसरातले बर्फाचे उत्तुंग डोंगर आज पेटले आहेत या खंडप्राय देशाचे स्वातंत्र्य अखंड. अक्षय. अभंग राखण्यासाठी, सीमेवर वळवळणाऱ्या पाकी बांडगुळांना चिरडून टाकण्यासाठी, हजारो भारतीय तरुण सैनिक कारगिल, द्रास, बटालिक या पंधरा-सोळा हजार फूट उंचावरील भागात डोळ्याचे सूर्य करून. प्राण तळहातावर घेऊन लढत आहेत, त्यांना आमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. पण आमच्या अत्यंत संपृक्त भावनांचे... शुभेच्छामय भावनांचे नैतिक बळ त्यांच्या पाठीशी राहिले तर त्यांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे.

राहतील मागे का भारतीय नारी?/ १३७