पान:मनतरंग.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा नियम आहे. धर्मानुसार कायदे बदलत नाहीत अमेरिकेत जाताच तिथेही सकिनाची नोंद नवाज़ची पत्नी म्हणून झाली होती. नवाझने तेथील नागरिकत्व स्वीकारले होते. तेथील कायद्यानुसार प्रथम पत्नीशी घटस्फोट झाल्याशिवाय दुसरा विवाह करता येत नाही. सकिना अमरिकेत परतल्याने 'तलाक'चा धोका पूर्णपणे टळला होता.
 तीच सकिना रुबाबदार साकीबला घेऊन माझ्यासमोर उभी होती. "दीदी, परसोही बंबईमे आयी. आज सुबह यहाँ पहुंची तो पहले आपको ही याद किया" सकिना उत्साहाने बोलत होती.
 "मी न्यूयॉर्कला पोहोचेपर्यंत खात्री नव्हती की नवाज़ घ्यायला येईल की नाही ते ! पण नवाज़ सुरेखशी बेबी कॅरिअर घेऊन स्वागताला आला होता. दीदी, वर्षानुवर्षे झालेले संस्कार काही दिवसात नाहीसे होत नाहीत. नवाजच्या अम्मी-अब्बांपेक्षाही बाकीच्यांचेच दडपण होते. नवाजने भारतात येऊन तलाक घ्यावा म्हणून. नवाजने भारतात येण्याचे, कोणालाही पत्र पाठवण्याचे टाळले. दीदी मी एवढी एम.एस्सी. झाले, पण कायद्याचे ज्ञान म्हणावे तर शून्य. नवाजचे म्हणणे की मी ओळखायला हवे होते की, युरोपीय राष्ट्रांत त्या देशात राहणाऱ्यांसाठी कायदा एकच असतो.
 जाताना नवाज़च्या अम्मींना घेऊन जाणारेय. त्या खूप प्रेमळ आहेत. त्यांनासुद्धा काहीही दोष नसताना, भांडण नसताना शिकलेल्या सुनेला तलाक देणे मान्य नव्हते. सकिनाचा प्रश्न ती अमेरिकेत होती म्हणून सुटला. पण आज भारतात हजारो सकिना आहेत. कॅथॉलिक प्रवाहात अडकलेल्या आयरिन वा ओल्गा आहेत, कायद्याला हरताळ फासून पहिली पत्नी असूनही दुसरा वा तिसरा... चौथा विवाह करणारे 'हिंदू' भारतीय आहेत. या सर्व असहाय भारतीय महिलांची कौटुंबिक अत्याचार, अन्यायातून सुटका करण्याचा एकच मार्ग आहे. 'समान कुटुंब कायदा !' पण तो करण्याची राजकीय हिंमत, सामाजिक जाण कोण दाखवणार ? शेवटी आमची नजर मतांच्या गठ्यांवर !!

■ ■ ■

एक देश : एक कुटुंब कायदा /१३५