पान:मनतरंग.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भवतालच्या आशियाई राष्ट्रांशी दोस्ती करण्याची भूमिका भारताने घेतली होती. 'हिंदी चिनी भाई भाईचे' स्वर आसमंतात घुमताहेत तोवरच चीनने हिमालयावर स्वारी करून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. हिमालयाच्या सीमेवर चीनने सैन्य आणून उभे केले. आत घुसखोरी करून रस्ता बांधला. तेव्हाचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना लोकक्षोभाला समोरे जावे लागले. आम्हां भारतीयांचा युद्धाचा पहिलाच अनुभव...सैन्याजवळ ना गरम कपडे, खाण्यापिण्याची रसद. अनुभव नवा. पण अत्यंत हलाखीच्या अवस्थेतही आमचे जवान ध्येयधुंद होऊन लढले. या जवानांना भारतीय जनतेनं अपरंपार नैतिक बळ दिले. पंडित नेहरूंच्या उपस्थितीत गायलेले लताजीचे गीत...

"ऐ मेरे वतनके लोगो जरा आँखोंमे भर लो पानी..."

आजही या गाण्यातले शब्द...स्वर मन थरारून टाकतात.
 मात्र त्या काळातला एक अनुभव नेहमी स्मरतो. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आक्रमणाची हवा पोहचवावी या हेतूने भारलेले आम्ही काहीजण ग्रामीण भागात भारताचा नकाशा घेऊन हिंडत होतो. आम्ही राष्ट्र सेवा दलाचे ६-७ जण. माझं नुकतंच लग्न झालेलं. त्यातून जातीबाहेरचे लग्न. उत्सुकतेपोटी बैठकींना भरपूर बायका-पुरुष येत. 'चिनी आक्रमणाचा फार्स' त्यावेळी रामभाऊ नगरकर आणि दादा कोंडके सादर करीत. त्यातील काही गाणी आधाराला घेऊन आम्ही अभिनयासह भाषणाद्वारे हा विषय लोकांपर्यंत नेत होतो.
 एका खेड्यात मला मध्येच अडवीत एका आजींनी प्रश्न केला. "अगं सुने, आताच लगीन झालंया, तुझां वानीकिनीचा संवसार करायचा सोडून भटकभवानीसारखी कशापायी हिंडतीस गं ? हिमालयामंदी लढाया जायची गरजच काय ? आमचा संकरबाप्पा आनि त्याचे नंदी. भैरवगण समदे हायेत ना तिथं. तो चिनी की फिनी कवाच खल्लास करून टाकला असल त्यांन...बोल, काय हाय तुझं म्हणनं ?" आजींच्या प्रश्नाला होतं का माझ्याजवळ उत्तर ? १९६५ मध्ये पाकने आमच्यावर युद्ध लादले. १९६४ मध्ये पं.नेहरू स्वर्गवासी झाले आणि पाकिस्तानाने युद्धाचा डाव टाकला. 'जय जवान, जय किसान' ही पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी दिलेली घोषणा प्रत्येक भारतीयाने हृदयात झेललीही. लहानथोरांनी शुक्रवारी भात खाणे सोडले. आमच्या जवानांनी थेट लाहोरपर्यंत

मनतरंग / १२८