पान:मनतरंग.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करवून घेतली. तपासणीचा निकाल सकारात्मक होता. कोणताही अपराध नसताना, कोणतीही चूक नसताना एका निष्पाप... निरागस मुलीच्या शरीरात नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणातून 'एच.आय.व्ही' विषाणू शिरले होते.
 नमिताच्या मनात एकच विचार होता आत्मघाताचा. या विचाराची चाहूल लागल्यामुळे आई बावरून गेली होती. वडिलांच्या कानांवर ही गोष्ट जाताच ते नमिताच्या वडील दिराचा खून करण्याची भाषा दारूच्या नशेत बोलू लागले. दारूचे व्यसन अधिक वाढले. धाकटा भाऊ बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्गात होता. त्याला भीती वाटते आहे की, बहिणीचा रोग आजूबाजूच्या लोकांना कळला तर लोक आपल्याला बाजूला टाकतील. समाजात बदनामी होईल. लग्न झालेल्या मोठ्या दोघी बहिणींना या बाबतीत एक अक्षरही कळता कामा नाही. असा धाक त्याने सर्वांना घातला आहे. नमिताला तात्काळ लांबच्या महिलाश्रमात ठेवावे. तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या विमापॉलिसीचे पैसे बँकेत ठेवून येणाऱ्या व्याजात तिची सोय करावी आणि भविष्यात त्यानेही त्यात पैशाची भर टाकून हा प्रश्न कायमचा सोडवावा. पण नमिताला तात्काळ इथून दूर... दूर पाठवावे हा त्याचा हेका.
 ...हे सारे प्रश्न घेऊन अकाली वठलेल्या जुईवेलीसारखी नमिता आणि तिची आई माझ्यासमोर उभ्या आहेत. उत्तर शोधण्यासाठी माझ्यासमोरच नव्हे तर समाजासमोर... संस्कृतीसमोर उभ्या आहेत. उत्तर शोधण्यासाठी मदत करणार आहोत ना आम्ही ? आज एक नमिता समोर आहे पण गावागावांतील अशा नमितांची संख्या वाढतेय याचे भान ठेवणार आहोत का आम्ही ?

■ ■ ■

मनतरंग / १२६