पान:मनतरंग.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केसांची पाठीच्या खालपर्यंत झुलणारी वेणी. एन.सी.सी त चमकणारी, स्नेहसंमेलन गाजवणारी ती नमिता आणि माझ्या समोरची, विशीच्या आत वैधव्याच्या शापाने निस्तेज झालेली नमिता.
 मी तिला आणि तिच्या आईला बसायला सांगितले. तिच्या आईला शांत होऊन नीटपणे काय ते सांगण्याची विनंती केली. प्रत्येक शब्द उच्चारताना त्यांचा ऊर भरून येत होता. एक वाक्य धड बोलणे शक्य नव्हते. नमिता मात्र गोठलेल्या बर्फासारखी बसून होती.
 ...गावातील एका बँकेच्या अधिकाऱ्याने नमिताला वक्तृत्व स्पर्धेत बोलताना पाहिले होते. धडाडीने बोलणारी, स्वच्छ आणि नेमक्या शब्दांत आपला विषय मांडणारी ही तरतरीत मुलगी कोण ? त्याने सहज चौकशी केली. आणि ती त्याच्या जातीतली निघाली. एक तर ही जात महाराष्ट्रात क्वचितच आढळणारी. त्यातून शिकलेल्या मुली शोधून मिळणे कठीण. या अधिकाऱ्याचा धाकटा भाऊ पुण्यातील एका कारखान्यात कामाला होता. इंजिनियरिंगचा डिप्लोमा झालेला असल्याने पगारही भरपूर होता. घरातला धाकटा मुलगा म्हणून लाडावलेला. आपल्या भावासाठी ही मुलगी योग्य नव्हे तर अतियोग्य आहे हे पाहून त्याने नमिताच्या वडिलांच्या घरी घिरट्या घालायला सुरुवात केली. तिचे वडील सरकारी शाळेत चपराशी म्हणून काम करणारे. लग्नासाठी जवळ पैसा तर हवा ना ? त्यामुळे त्यांनी नकार दिला. परंतु हुंडा न देता, चार पैसे खर्च न होता लेकीचे लग्न होतेय म्हटल्यावर त्यांनीही होकार दिला आणि महाविद्यालयाची दुसऱ्या वर्षाची पायरी न चढताच नमिता बोहोल्यावर चढली.
 पहिले चार महिने बरे गेले. परंतु नवऱ्याला रात्री खोकला येत असे, भूक लागत नसे. पण 'दुसरी भूक' मात्र आवरत नसे. दोन दिवसांचे माहेरपणही कधी मिळाले नाही. खोकल्याबरोबर तापही येऊ लागला आणि डॉक्टरांनी निदान केले की नवऱ्याला एड्सची लागण झाली असून केस अखेरच्या टप्प्यावर आहे. विवाहानंतर अवघ्या चौदा महिन्यात नमिता वैधव्याचा कोरा पट्टा घेऊन माहेरी आली. एन.सी.सी च्या शिबिरात, महाविद्यालयात एड्स या महाभयानक रोगाबद्दल नमिताने ऐकले, वाचले होते आणि म्हणूनच तिने माहेरी आल्यावर आईजवळ आग्रह धरला की तिचीही एच.आय.व्ही. टेस्ट करावी. वडिलांना कसलीही कल्पना न देता मायलेकींनी पॅथॉलॉजिस्टकडून शरीरविकृती प्रयोगशाळेतून तपासणी

उत्तराच्या शोधातले प्रश्न / १२५