पान:मनतरंग.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 अकाली वठलेल्या जुईसारखी ती समोर उभी होती. करपलेला सावळा रंग निस्तेज झालेला. उद्ध्वस्त डोळे, कपाळाला टिकली नाही. मळखाऊ रंगाच्या साडीचा दोन्ही खांद्यांवरून घेतलेला... जणू काहीतरी झाकण्यासाठी अंग भरून घेतलेला पदर. जमिनीत शिरणारी नजर.
 "ताई ओळखलंत का ? ही नमिता आहे" तिच्या आईने मला प्रश्न केला.
 "ओळख कशी विसरीन ? पण हिचं लग्न केलंत? आणि हे असं कधी घडलं?"
 गेल्याच वर्षी महाविद्यालयातून खेळात, नाटकात, वक्तृत्व स्पर्धेत भरपूर बक्षीसं पटकावणारी आणि विद्यापीठाच्या परीक्षेत आमच्या महाविद्यालयातून पहिली येणारी नमिताच ना ही ? "शिक्षण अर्ध्यातनं सोडून का केलंत लग्न ? यंदा बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला असती ही!" माझ्या प्रश्नाच्या भडिमाराने तिची आई गांगरून गेली. हे प्रश्न माझ्या तोंडूनही आपोआप सुटलेले होते.
 ...मला क्षणभर आठवली दोन वर्षांपूर्वीची नमिता. तजेल तुळशीच्या झाडासारखा सावळा रंग. विलक्षण बोलके, तेजस्वी डोळे. महिरपदार ओठ, दाट

मनतरंग / १२४