पान:मनतरंग.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वा भावंडाच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या देहाचे हाल करीत पैसा पुरविणारी स्त्री, स्वत:च्या शब्दांत दुःख सांगू लागते तेव्हा काळही गोठून जातो. ती मैत्रीण सांगत होती-ज्या स्त्रिया निघृण प्रकारांना विरोध करतात, अशांच्या नावांची काळी यादी हाँगकाँगमध्ये तयार केली जाते. त्या यादीतील महिलांना नोकरीच्या बाबतीत मदत करण्यात येत नाही. ती मैत्रीण विचारीत होती, घरकाम, मुलांना साभाळणे, वृद्धांची सेवा करणे अशा कामांच्या नावाने परदेशात नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या, नकार दिल्यास बेदम मारणाऱ्या मालकांची काळी यादी कोण तयार करणार ?
 हे सारेच प्रश्न मन उसवणारे आहेत आणि त्यासाठी स्त्रियांनी एकत्र येऊन 'त्रिंजन' भरवायला हवे. ज्यात मोकळेपणाने प्रश्न मांडता येतील. दु:ख मोकळे करता येईल. तिथे येणाऱ्या स्त्रिया नसतील सासवा, सुना... जावा... नणंदा. त्या असतील एकमेकींना साक्ष देणाऱ्या, एकमेकींना दिलासा देणाऱ्या, विश्वास... शक्ती देणाऱ्या मैत्रिणी. हे पंजाबी 'त्रिंजन' मराठी अंगणातही भरवता येईल की!!

■ ■ ■

पंजाबी 'त्रिंजन' मराठी अंगणा' तही येईल! / १२३