पान:मनतरंग.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 असा भेदक सवाल विचारणारी कमला त्या दिवशी प्रत्यक्ष समोर होती. नाजूक तरीही कणखर. लयीत पावलं टाकीत साभिनय गाणारी कमला बोलताना, शब्दांतून व्यक्त होणाऱ्या अनुभवात श्रोत्यांना बांधून टाकणारी कमला मनात ठसली. ती मनातलं दु:ख बोलत होती... ४७ वर्षांपूर्वी माझ्या पंजाबच्या शरीरावर दोन देशांची दारे खोदली गेली. धर्माच्या नावाने भावा-बहिणींची... एकमेकांवर प्रेम करणाऱ्या शेजाऱ्यांची ताटातूट झाली. आम्हा पंजाबींचे जणू जीवनच लुटले गेले. पंजाबी स्त्रिया दिवसभर शेतात राबत. सायंकाळी मात्र एकीच्या अंगणात साऱ्याजणी जमत. त्यांत धर्म कधी आडवा आला नाही. येताना सोबत आणत शेतातील कापूस आणि टकळी, शिवाय सायंकाळची रोटी. या एकत्र जमण्याला म्हणतात त्रिंजन. मध्ये एकमेकींच्या आनंदाची, दु:खाची, अडचणींची देवाण घेवाण होई. सासू, सुना, नणंदा, भावजया, जावा... अशी सारी नाती एकत्र येत. अडचणीतून मार्ग निघे. कधी कधी ढोलकच्या तालावर, गाण्यांनी अंगण जागते होई. त्याला पावलांची साक्ष मिळे. लेकी-सुनांच्या सवालजबाबांनी 'त्रिंजन' दणाणून जाई. या 'त्रिंजन संगमात' पुरुषांना प्रवेश नसे. ते त्रिंजन आपण महिलांनी पुन्हा एकदा सुरू करायला हवे. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या जीवनाचे सूत तलम निघावे, त्यात गाठी नकोत, ते सपोत असावे यासाठी आपण हा प्रयत्न करायला हवाच. जीवनात कितीतरी सरहद्दी आहेत ! जातीच्या, भाषेच्या, प्रांतांच्या, धर्माच्या लिंगभेदाच्या... अनेक अनेक. या त्रिजनसंगमातून आपण स्त्रिया एकमेकांना साधणारी खिडकी नाही का बनू शकणार ?

"मै सरहदपे खडी दीवार नही हूँ
मै तो हूँ दीवार की दरार, सब का स्वागत
करनेवाली ।"

मनाची खिडकी सहजपणे उघडून गेलेली कमला कायम आठवत राहते.
 या कार्यशाळेत जकार्ताच्या सुप्रहाती आणि ताती कृष्णवती या मुस्लिम महिलांनी आपल्या देशातील स्त्रियांचे प्रश्न मांडले. आहे ना मजा ? सुप्रहाती - सुप्रभाती कृष्णवती संस्कृत शब्दाशी, भारतीय भाषांशी नाते सांगणारी नावे आणि त्यांचा देश इंडोनेशिया. स्थलांतरचा लोभ दाखवून अशियातील तरुण स्त्रियांना फसवणाऱ्या अनेक एजन्सीज आहेत. आपल्या घराला दोन वेळच्या रोटीसाठी

मनतरंग / १२२