पान:मनतरंग.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या दिवशी रात्री अलकॉम (अल्टर्नेट कम्युनिकेशन्स फोरम) आणि माध्यम या स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेला, 'इलयुम मल्लम' हा चित्रपट छोट्या पडद्यावर पाहण्याचा योग आला. या दोनही संस्था, कम्युनिकेशनच्या... संवादाच्या विविध माध्यमातून परिवर्तनाचा विचार सर्वांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत असतात. या शब्दाचा अर्थ आहे, पाने आणि काटे. पाने काट्यावर पडली काय किंवा काटे पानांवर पडले काय, परिणाम एकच फाटतात पानेच!! काट्यांना काय त्याचे?
 पल्लवी जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात चार मैत्रिणींची कथा आहे. शांता, पार्वती, लक्ष्मी आणि श्रीदेवी या त्या छोट्याशा गावातल्या चार मुली. हातमागाच्या कारखान्यात रोजंदारीवर जाणाऱ्या, कारखान्यात जाताना... येताना चौघीही बरोबर असत. एक तीळ चारजणीत वाटून खाणाऱ्या. अगदी जीवश्च कंठश्च मैत्रिणी. त्यांनी नुकतेच बालपण ओलांडले आहे. नव्या वयासोबत स्वप्नांचे झुले डोळ्यात झुलू लागतात. मनही चंचल बनते. मनात नवे विचार नवे अनुभव, नवे प्रश्न यांचे तरंग उठू लागले आहेत. घरातून-समाजातून सतत सांगितले जाते की मुलींनी मान खाली घालून

मनतरंग / ११८