पान:मनतरंग.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अरब देशात पाठविल्या जातात. नेपाळ, थायलंड हे देश आघाडीवर. ती जे सांगेल त्याचे इंग्रजी-हिंदी भाषांतर करून संध्या श्रेष्ठ सांगत होती. भरपूर पगार, परदेशगमनाचे आकर्षण या जाळ्यात अडकलेली ती सुशिक्षित मुलगी, त्या भयानक अनुभवाने मुळासकट हादरून गेली. ना तिथली भाषा अवगत, ना जनसंपर्क. लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या मुलीला अक्षरांनी आधार दिला. चोरून पत्र टाकले. मग तिच्या देशातील स्वयंसेवी संघटनेनं पुढाकार घेऊन तिला सोडवले.
 आणि सांगली परिसरातील दुर्गा आमच्यासमोर प्रश्न फेकणारी.
 "ताई, तुमच्यापाशी बुद्धी हाये; डोक हाये; तुमच्या मायबापानी शिकिवलं ते डोकं इकून तुमी चार पैशे मिळिवता. मला शिक्षण मिळालं न्हाही. माज्यापाशी डौलदार शरीर हाय... पुरसांना हवा तसा बांधा हाये. ते इकून मी चार पैशे मिळिवते. जे जवळ हाये ते इकायचं नि चार पैशे कमवायचे. मग तुमच्यात नि माज्यात फरक तो काय ?"
 दुर्गाचा प्रश्न ऐकणाऱ्यांना अस्वस्थ करणारा, ती अग्निघटिकाच अंगावरचे संस्कृती, जागृती, संस्कार, शक्ती, मुक्ती वगैरे रेशमी आणि बांधीव कपडे फेडणारी, ऐकणाऱ्याला होरपळवणारी.
 तेव्हा उन्हाचा ताप वाढू लागला की ती अग्निघटिका थेट मनासमोर उभी राहते.

■ ■ ■

अग्निघटिका आणि अग्निसाक्षी/ ११७