पान:मनतरंग.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उरातली सल मोकळी करणारी स्त्री फक्त शिव्यांची धनीण होते. त्यामुळे सामाजिक पर्यावरणही बेताल झाले. या पर्यावरणाने समतोल साधावा यासाठी प्रत्यक्ष अन्यायग्रस्त स्त्रियांना बोलके करून, 'अग्निघटिका' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. टाकलेल्या विवाहिता, चेटकिणी ठरवून ज्यांना मारण्याचा प्रयत्न झाला अशा स्त्रिया, देवदासी प्रथेतून वेश्याव्यवसायाकडे ढकलल्या गेलेल्या तरुण मुली, मुलगी जन्मली की तिला मारून टाकायचे, फक्त एक मुलगी जिवंत ठेवायची, या प्रथेची बळी एक 'आई'; पर्यटन व्यवसायातून वेश्याव्यवसायात ढकललेल्या मुली सगळ्याजणी प्रश्नांना स्वत: तोंड देणाऱ्या. त्या व्यासपीठावर येऊन लोकांच्या न्यायालयात साक्ष देत होत्या. अग्निघटिका... अग्नि झेलताना झालेल्या तडफडीतून उमटलेले उद्गार !!
 झारखंडातील हल्ल्यांनी घायाळ झालेली ही स्त्री. चेटकीण नव्हती. दोन मुलांची आई, पतीची लाडकी. भरपूर कष्ट करी. आवाज गोड. खूप गाणी येत. गाणी गुणगुणताना हातही वेगाने चालत. दारूच्या नशेत शेजाऱ्याने छेडले. हिने प्रतिकार केला. नवरा साधासुधा. दिवसभरच्या कष्टांनी थकणारा. शेजाऱ्याशी भांडण्याचे बळ नव्हते.
 कामात हुशार असूनही, नवऱ्याचा तिच्यावर विश्वास असूनही शेजाऱ्याने स्वतःच्या प्रतिष्ठेच्या आणि पैशाच्या बळावर तिला चेटकीण ठरवले. ओझा... त्यांचा धर्मगुरु. त्याला हाताशी धरून तिला मारण्याचा प्रयत्न केला. महिला सामाख्याच्या कार्यकर्तीच्या मदतीने ती वाचली...
 तामिळनाडूतील उसलामपट्टी जिल्ह्यातील काही जमातीत एकच मुलगी जिवंत ठेवतात. ही आई त्यातलीच. तिच्या पहिल्या दोन मुली जन्मतःच मातीत पुरून टाकल्या. तिसरीच्या वेळी हिने लढा दिला. नवऱ्याचे म्हणणे की मुलगा झाल्यानंतरची एक मुलगी जिवंत ठेवू. नुकतंच जन्मलेलं लेकरू ठार मारण्यासाठी हातून ओढून नेतानाची जिवाची काहिली सांगताना तिला अश्रू आवरेनात. समोर बसलेले असंख्य साक्षीदारही अश्रू पुसत होते. पण कडेवरची ती वर्षा-दीड वर्षांची गोंडस मुलगी मात्र गालभरून हसत होती...
 बेकारीची कुऱ्हाड प्रथम स्त्रियांवरच कोसळत असते. अशियाई देशांतील वाढते दारिद्र्य, वाढती लोकसंख्या, कुटुंबात वा समाजात स्त्रियांना नसलेले स्थान, या बाबींचा फायदा घेतला जातो. थोडेफार शिकलेल्या तरुणी 'मदतनीस' म्हणून

मनतरंग / ११६