पान:मनतरंग.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 स्त्री ही निसर्गाचं रूप आहे. निर्मितीसाठी लागणारा काळ, वेदना, भावबंध यांचा ती प्रत्यक्ष अनुभव घेत असते. म्हणूनच ती आई असते. निरपेक्षपणे भवतालच्या परिसराला चैतन्य देत जाणारी लोकमाता नदी असते. जगभर मायेचा... ममतेचा सुगंध पसरवीत जाणारी वाऱ्याची शीतल लहर असते. सुखदुःख, चांगले वाईट, अग्निज्वालांचा... घनघोर पावसाचा वर्षाव... उरात सामावून घेत जीवनातले चैतन्य हिरव्या अंकुरातून जन्माला घालणारी भूमाता असते. दशदिशांतून येणाऱ्या अनुभवांना पचवून जमिनीवर ठामपणे उभी राहणारी साक्षात् ज्ञानदा असते... वृक्षासारखी. अशा पंचरूपांतून निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते सतत जागते ठेवणारी स्त्री गेल्या काही हजार वर्षांपासून स्वत:चे अस्तित्व हरवून बसली. निसर्गातील झाडांची कटाई झाली, नद्यांचे पाणी रासायनिक द्रव्ये आणि माणसांची घाण मिसळल्यामुळे दूषित झाले. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. पावसाळ्याने आपले वेळापत्रक बदलले. उन्हाच्या झळांनी तपमानाची उंची पार केली. थंडीच्या दिवसात उकाड्याने हैराण केले.
 शेकडो वर्षांपासून तऱ्हेतऱ्हेचे अत्याचार, अन्याय निस्पंदपणे सोसणारी, आतल्याआत घुसमटणारी, दगडी जात्याजवळ नाहीतर लाकडी मुसळाजवळ

अग्निघटिका आणि अग्निसाक्षी/ ११५