पान:मनतरंग.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चेटकीण ठरवून मारले गेले होते. आमच्या लोककथांतही चेटकीण असतेच की. तिचे डोळे चकचकीत असतात, ती म्हातारी किंवा तरुण आणि अतिसुंदर असते. जर्मनीतील चेटकिणींच्या कथा तेथील दगडी किल्ल्यातून फिरताना ऐकल्या होत्या.
 अशावेळी ऱ्हेनफेल यांचे मत आठवते. जेथे जेथे कृषिप्रधान जीवनपद्धती होती, तेथे मातृसत्ताक जीवनपद्धती विकसित झाली. दृढ झाली, अत्यंत जोमात वाढली. त्यामुळेच ती नष्ट करून पितृसत्ताक जीवनव्यवस्था स्थापित करताना, तिची मुळे निर्घृणपणे खणून काढावी लागली.
 ही मुळे खणून काढण्यासाठी तीन हत्यारे वापरली. एक म्हणजे बालविवाह, दुसरे पुरुषाला अनेक विवाह करण्याची मुभा आणि तिसरे विधवा स्त्रीने पतीबरोबर सहगमन करावे वा स्वत:वरचे निर्बंध स्वीकारून कुरूप करून घ्यावे. कारण परंपरेने मानले की विधवा अर्धमृत असते.
 पंधरा दिवसांपूर्वीच कळले की नवऱ्याच्या माराचे वळ सोशीत, नेहमी हसतमुख असणाऱ्या, लहानग्यांसाठी सतत कष्ट करणाऱ्या उर्मिलाने स्वत:ला जाळून घेतले. गेली दहा वर्षे अत्यंत उत्साहाने पडलोणची करणारी, कवडी कवडीची काटकसर करून घर घेणारी, लेकीला शिकवून, तिला पायावर उभे करून तिचे लग्न करणारी उर्मिला. तिला झाले तरी काय होते ? एक दिवस तिच्या शेजारचे गृहस्थ भेटले. त्यांना विचारले नि मन बधिर झाले. आता बापाबरोबर मुलगाही सामील झाला होता दारूच्या नशेत. "दारू नव्हेत मूत पिताहात' असे ओरडून सांगणाऱ्या उर्मिलाचा आवाज, "या बाया लई शान्या होऊन बोलाया लागल्यात, हिचा आवाज कायमचा बंद करून टाका", असे म्हणत त्या दोघांनी दारूच्या धुंदीत तिचा आवाज कायमचा मिटवून टाकला होता. असं पाहिलं... ऐकलं की वाटतं किती शतकं हा लढा खेळत राहायचा ?

■ ■ ■

मनतरंग / ११४