पान:मनतरंग.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदिवासी स्त्रियांचे प्रश्न मांडले होते रामदयाल मुंडा यांनी. बोलण्याला साथ होती बासरीच्या आदिम स्वरांची त्यांनी सांगितलेली मिथककथा आजही अंगावर काटा आणते...
 ...या आदिवासींचा डोंगर देव मारंगबुरू. तो ठरावीक रात्री पुरुषांना ज्ञान देई आणि स्त्रियांना कसे ताब्यात ठेवायचे याची विद्या शिकवी. त्यामुळे स्त्रियांना खूप त्रास होई. स्त्रियांनी एकत्र येऊन गुफ्तंगू केले आणि एक युक्ती केली. पुरुषांना दारूची आवड. ज्या रात्री देव ज्ञान आणि विद्या देतो त्या दिवशी स्त्रियांनी पुरुषांना भरपूर दारू पाजली. पुरुष दारू पिऊन धुंद झाल्यावर, सर्व स्त्रियांनी पुरुषांचा पोषाख केला आणि त्या डोंगरदेवाकडे गेल्या. बिचारा डोंगर देव, शंकरासारखा साधा भोळा. त्याने पुरुष समजून स्त्रियांना ज्ञान दिले. त्या हुशार आणि तल्लख झाल्या. स्त्रिया बुद्धिमती झाल्या की पुरुषांना वैताग येतोच. अगदी आजही. पुरुषार्थाला धक्का वगैरे. कारण बायकांची अक्कल चुलीपर्यंत चालावी ही रीत. अगदी उच्चशिक्षित समाजातही अनेकांची ही प्रवृत्ती. ते तर आदिवासी होते. मग सगळे पुरुष डोंगरदेवाकडे... मारंग बुरूकडे गेले. डोंगरदेव म्हणाला, मूर्खानो, दारू कुठे एवढी पितात? तुम्हीच तुमचे नुकसान केले. आता मी तुम्हाला हुशार स्त्रियांना 'चेटकीण' कसे ठरवायचे त्याची कला शिकवतो, युक्ती सांगतो. तेव्हापासून हुशार आणि शहाण्या स्त्रीला समाज चेटकीण ठरवून मारीत असे. अशा विच हंटर्सनी... चेटकिणी मारणाऱ्यांनी, शेकडो हुशार... अनुभवाचे शहाणपण समाजाला देणाऱ्या स्त्रिया नष्ट केल्या. या स्त्रियांचे दुःख जाणून त्यांचा बचाव करण्याचा व समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचा प्रयत्न केला बिरसामुंडा यांनी. अवघा झारखंड पालथा घालून या युवकाने आदिवासींच्या उन्नतीसाठी जीवाचे रान केले. पण बिरसामुंडा सरकारला खपला नाही. माणसातला माणूस जागा होणे म्हणजे इंग्रजांच्या हुकूमशाहीला आव्हान. हे आव्हानच इंग्रज सरकारने गाडून टाकले. पण आजही झारखंडातील आदिवासी बिरसामुंडा या जगात नाही हे मानायला तयार नाहीत. त्यांना वाटते की बिरसामुंडा दिल्लीला गेलाय नि सरकारशी आदिवासींच्या विकासासाठी बातचीत करतोय... भांडतोय...
 ते ऐकत असताना मला जर्मनीतले अनुभव... गप्पा आठवल्या. जर्मनीतही अनेक हुशार, वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना

बोलणाऱ्या झाडांना मिटावे लागते तेव्हा... / ११३