पान:मनतरंग.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वगैरे कामं घरातले पुरुष करीत. पण आता असे म्हणतात, जगातील एकूण श्रमापैकी ६७ टक्के श्रम स्त्रियांच्या नावावर आहे. ही बातही उन्हाची तलखी वाढवणारी !
 वयाच्या चौथ्या वर्षापासून परीक्षा द्यायला जे सुरुवात करायची ती थेट पंचविशी ओलांडेपर्यंत. किंवा मग कितीही वर्षे; आम्ही इंटरला होतो तेव्हा एक पन्नाशीच्या 'विद्यार्थिनी' नऊवार साडी भव्य कपाळावर चंद्रकोर, हातात घड्याळ अशा थाटात सायकलवरून कॉलेजला येत.आमच्याच वर्गात होत्या. लॉजिकची समीकरणं पाठ करता करता डोकं थकून जायचं. पण मावशींच्या जिभेवर समीकरणं अगदी गोंदलेली. शेवटी आम्ही रहस्य विचारलं. त्यांचं उत्तर असं,
 "अग सोपं आहे फार. मी समीकरणांचे कागद भिंतीला चिटकावून ठेवलेत. पोळ्या करताना, भाजीला फोडणी देताना अगदी देवाला फुलं वाहताना सुद्धा तेच डोळ्यासमोर असते. मग न कळत मनाट फिट्ट बसते. पोरींनो, मी काही नोकरीच्या हिशेबाने शिकत नाहीये. मला खूपखूप हौस आहे शिकायची. बस!"
 परीक्षांचा ताण दिवसेंदिवस वाढत चाललाय. शिकणे, अभ्यास, परीक्षा या बाबी जगाबद्दलच्या उत्सुकतेशी, ज्ञानाशी बांधलेल्या राहिलेल्या नाहीत. त्या व्यवसाय, उपजीविका यांच्याशीच केवळ जोडल्या गेल्या आहेत. मग या परीक्षा केव्हाही आणि कुठेही घेतल्या तरी हवा 'गरम' करणारच !!

■ ■ ■

काटेरी मौसम /१११