पान:मनतरंग.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणायच्या, पुस्तकं आणायची, थकलेले डोळे फाडफाडून अक्षरे वाचत राहायची. मेंदूत ठसवीत राहायची. एखाद्या क्षणी अशी डुलकी लागणार की जणू काही काळ जग बुडून गेलंय...
 "ए पोरी ते परिक्साफिरिक्सा ऱ्हाऊंदे बाजूला. हितं जल्माची परक्साहाय. म्होरल्या साली द्ये पेपर. समोरच्यान् ला त्याच दिसी येळ हाय. पोरगं दोन दिस सुटीवर आलंय. त्यात बक्कळ पोरी पाहिच्यात, आन् पसंत क्येली तर परिक्सेआंदीच पोरगी पास आमची ! काय ?"
 शिकण्यासाठी तालुक्याच्या गावी वसतिगृहात राहणाऱ्या मुलीला घरी घेऊन जायला आलेल्या वडलांचे फर्मान.
 काही घरांच्या खिडक्यांतून रात्रभर जागणाऱ्या दिव्यांचा झगमगाट, मधूनच फास्ट फटफटीचे आवाज. मग हलक्या पावलांनी येणारी जाणारी माणसे. हलक्या आवाजातली खुसरफुस... खुसरफुस. दुसऱ्या दिवशी पेपर फुटल्याच्या, मुख्य प्रत मुख्य ठिकाणातून दहा हजाराला गावातून पोचल्याच्या आणि त्याच्या हजारो झेरॉक्स प्रती दोनशेला एक या भावात विकल्याच्या, हवेतून उडणाऱ्या वावड्या.
 "त्या अमक्या मास्तरानं तमक्या गल्लीतल्या पोराच्या अंगाला बांधलेल्या कॉप्या त्याला उघडा करून काढल्या,' "त्या मास्तराला संध्याकाळी धरलं ना खडकावरच्या पोरांनी. चोळामोळा करून रस्त्यात फेकून निघून गेले."
 "अरे पण कशाला डोळे उघडे ठेवून वर्गातून फेऱ्या मारायच्या? आपणच डोळे उघडले नाही तर कशा सापडणार कॉप्या ? नि मग पकडणार तरी कोणाला? डोळे मिटून दूध प्यायचे बस् !"
 "चिनू ,आज्जी गावाला जातेय. तुझी परीक्षा आहे ना परवा ? तिला जय करून टाक बेटा' चार वर्षांच्या गोंडस पिल्लाची आई त्याला बजावतेय.
 "कैसी चल रही है स्टडी ? मै तो तंग आ गयी बाबा. दिनभर खाना पकाना, घरका काम और रातमे स्टडी. ये बारवी का साल..." एका 'अभ्यासू' आईचे फोनवरून दुसऱ्या 'अभ्यासू' आईशी बोलणे.
 परीक्षांचा मौसम सुरू झाला की विद्यार्थी, त्यांच्या आया यांचे हालच ! हो आयांचेच!
 पूर्वी बाजार करणे, मुलांना दवाखान्यात नेणे, मुलांचा अभ्यास घेणे

मनतरंग / ११०