पान:मनतरंग.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेण्याची भावली दिसली. मायीच्या हृदयातल्या आणि शरीरातल्याही आईने सत्य समोर ठेवले, त्या नराधमाला सात वर्षांची शिक्षा झाली. पण त्या कळीचे काय ? त्या कळीचा फुलण्याचा जन्मसिद्ध हक्क तिला या समाजात मिळेल ? शरीराच्या जखमा.. घाव, कालांतराने भरून निघतात. पण त्या चौदा वर्षाच्या कळीच्या मनावरचा घाव भरून येईल ? तो भरून यावा, तिला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी तिच्या भवतालची माणसे, नातलग मदत करतील तिला ?
 चार वर्षापूर्वी मुंबईच्या वेश्या विभागातून सुमारे साडेतीनशे बालिकांची सुटका पोलीस विभागाने केली. त्यापैकी दोनशेहून अधिक मुली नेपाळमधल्या होत्या. त्या मुलींचे पालक, नेपाळ शासन, त्या परिसरातील स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून, एकशे ब्याण्णव मुली नेपाळला परत पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला. मुली एअर इंडियाच्या विमानाने पाठविल्या जाणार होत्या. वेश्यावस्तीतून... त्या भयानक अत्याचारातून सुटका झालेल्या कळ्या... ज्यांनी सोळावे वर्षही पार केले नव्हते, या विमानातून जाणार होत्या. त्या विमानातन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी आपली तिकिटे कॅन्सल केली. तात्काळ रद्द करून टाकली. असल्या मुलींबरोबर गेल्याने ही मंडळी अपवित्र होणार होती म्हणे!
 सर्वच आशियाई देशांमधून कळ्यांचा व्यापार जोरात चालतो. नेपाळ, थायलंड, भारत यात अग्रेसर आहेत. बेसुमार वाढणारी लोकसंख्या... मग माणसांचाही व्यापार. अर्थात व्यापार म्हटला की मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रातला सिद्धान्त आलाच. पाश्चात्त्य देशांनी, युरोपीयन देशांनी शेकडो वर्षांपासून आमचा कच्चा माल लुटला, तीच परंपरा आजही !
 पटायामधली ती संध्याकाळ, आजही अंगावर सर्रकन काटा उमटवून जाणारी. जागतिक महिला परिषदेतून परतताना थायलंडमध्ये चार दिवस थांबलो होतो. तेथे पोटासाठी सर्वसामान्य स्त्रीला शरीर विकावे लागते असे ऐकले होते. अंगाला मसाज करणारी, अंग रगडून देणारी विद्यापीठे असतात म्हणे तिथे. हे सारेच पाहायचे होते. पटायाच्या समुद्रकिनाऱ्याने मैलोनमैल आम्ही चालत होतो. उजवीकडे विलक्षण देखणा समुद्र. मध्यात रस्ता आणि डावीकडे अर्धुक्या उजेडाची 'मोटेल', 'इन' नावाची दुकाने. त्यात सजूनधजून बसलेल्या मुली. सौदा पटला, गिऱ्हाईक मिळाले की समोरचा समुद्र किनारा गाठायचा. जेमतेम चौदा पंधराची, जिच्या डोळ्यातले बालपण अजून चिवचिवते आहे अशी मुलगी

मनतरंग / १०४