पान:मनतरंग.pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुफलीकरणाचे प्रतीक...जणू धरित्रीला सुफलित करणारे पुरुषतत्व. म्हणूनच नागपूजा...सर्पबंध ही संकल्पना केवळ भारतातच नाही तर इरत्रही होती. बॅबिलोनियातील अस्वार्ती नावाच्या कामदेवतेचे वाहन सर्प. सर्पदंश हे वासनादंशाचे प्रतिरूप आहे असा उल्लेख सर्व धर्मवाङ्मयातून आढळतो. ॲडम आणि ईव्ह यांच्या कहाणीत सर्प कामविकाराचे प्रतीक म्हणून येतो असे दैवतविषयक अभ्यास करणाऱ्या विद्वानांचे मत आहे. सर्प संपत्तीचे रक्षण करतो, जादूटोणा करतो असेही मानले जाते. युफरेट्स मधल्या तोरोनियम लोकांत सर्पपूजा प्रथम सुरू झाली. तेथून ती जगभर पसरली असे मत काही अभ्यासक मांडतात.
 अनेकविध वनस्पतीचा गर्भ वाहणारी भूमी आणि नाना विचार-विकार, संकल्प-विकल्प यांनी भारलेल्या मानवाचा गर्भ वाहणारी स्त्री यांच्यातील एकरूपत्व मानवाने आदिम काळापासून, विकासाच्या पहिल्या टप्प्यात स्वीकारले. स्त्रीचे देहधर्म, तसेच धरणीचेही असलेच पाहिजेत ही श्रद्धा त्याचवेळी त्यांच्या मनात गोंदली गेली. रजोदर्शन, पुष्पितावस्था, फलशोभन, ऋतू इत्यादी संज्ञा स्त्रीच्या सुफलन प्रक्रियेत येतात; तशाच धरणीच्याही असाव्यात. ती रजःस्वला झाल्याशिवाय पुष्पित कशी होणार ? फलशोभन कसे होणार ? यातूनच अंबुवाची सारखे विधी निर्माण झाले.

“वृष्टिमूलं कृषिःसर्वा,
वृष्टिमूलं व जीवनम्"

ही जाणीव कृषिग्रंथात जोपासली आहे. स्त्री रजस्व:ला असताना पुरुष-समागम टाळावा; तो निषिद्ध आहे असे मानले जाते. भूमीच्या रजस्व:ला काळात तिचा नांगराशी...म्हणजेच लांगलाशी संबंध येऊ नये असे मानतात. त्या काळात बीज पेरू नये. कृषिपराशरात हा काळ मृगनक्षत्राची अखेर आणि आर्द्रा नक्षत्राची सुरुवात हा आहे. या काळालाच 'अंबुवाची' असे म्हणतात.

 नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास, नागपंचमीला चुलीवर तवा ठेवू नये... विळीवर चिरू नये अशी समजूत; आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी कर. हे तीन दिवस महाराष्ट्रातही जमीन उकरीत नाहीत, औत हाकीत नाहीत. ओरिसा, आसाम, केरळ येथेही 'अंबुवाची' काळ साजरा होतो. महाराष्ट्रातील नागपंचमीचा सण...व्रत हेही अभ्यासकांपुढील एक शोधचिन्ह आहे.

■ ■ ■

नागपूजा : एक शोधचिन्ह / ३