पान:मनतरंग.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"पंचमीचा सण, नागोबा वेगीला
मुऱ्हाळी यावा मला,
पाठी भाऊ मागितला..
वेडाबागडा भाऊ, बहिणीला असावा
चार आण्याची चोळी,
एका रात्रीचा विसावा…"

 नागपंचमीचे नाते रोज रात्री अंगणात गायल्या जाणाऱ्या भुलईच्या गीतांशी, आकाशाला भिडणाऱ्या उंचउंच झोक्याशी, बारा घरच्या… बारा जातीच्या लेकीबाळींनी रानात जाऊन पूजलेल्या नागोबाच्या वारूळाशी, ज्वारीच्या लाह्या आणि नागपूजेशी जोडलेले आहे.

 नागपूजा ही अत्यंत प्राचीन आहे. ऋग्वेदात नागपूजेचा उल्लेख नाही मात्र तैत्तिरीय संहितेत तो आहे. पुराणात विष्णू शेषशाई आहे. तर शिवाच्या गळ्यात नाग आहे. बुद्धाच्या जन्मानंतर नंदउपनंद या नागांनी त्याला स्नान घातले असा उल्लेख आहे. जैन धर्मातही नागाचा उल्लेख आहे. बौद्धकाळात ब्राह्मण नागपूजा करीत; असे चिनी प्रवाशाने लिहून ठेवले आहे. सिंधू नदीच्या परिसरातील प्रत्येक गावात नागाची मंदिरे वा मूर्ती असतात अशी ह्युअेनत्संगने नोंद केली आहे. तक्षशिलाचे राजे नागपूजक होते. त्यांनी आपल्या चिन्हावर नागप्रतिमा मुद्रित केल्या होत्या. सौराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या सीमेवर…वेशीवर सर्पमंदिर सापडते. 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या इतिहासाची प्रत्यक्ष नोंद असलेला ग्रंथ असे दाखवितो की, काश्मीरचे राजे कर्कोटकाच्या वंशातले होते. शेषनाग, संतनाग, इंद्रनाग अशी अनेक देवळे प्रसिद्ध असून चिनाब नदीच्या तीरावर वासुकीचे मंदिर आहे. बंगालमधील वैद्य जातीचे लोक 'शुभराय' या नागावताराची पूजा नागमंडल या नृत्याने करतात. केरळ प्रांतातील प्रत्येक नायर हिंदूच्या घरी काऊस नावाचे छोटेसे सर्पमंदिर असतेच. त्याची पूजा केल्याने घरात लक्ष्मी वास करते, अशी समजूत आहे. पंजाबातील सफदोन या गावी नागपूजा विशेषत्वाने होते. या गावातच जनमेजयाचे सर्पसत्र झाले असे मानतात.
 नागाला क्षेत्ररक्षक मानले जाते. तो भूमीचे रक्षण करतो. शेतात वारूळ असणे शुभ मानतात. वारूळाची माती सुफला असते. वारूळ हे भूमीच्या सर्जनेन्द्रियाचे प्रतीक मानतात. नाग ही संतानदेवता मानली जाते. नागमनतरंग/२