पान:मनतरंग.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 रिंकू, अमृता, संगीता या 'टीन एजर्स'...अठरा-वीस वर्षाच्या तरुणींच्या यादीत पस्तिशी ओलांडलेल्या विद्याची भर पडली आहे.'तू हां कर या ना कर, तूही मेरी (ही)...किरण, रिंकू, विद्या वगैरे वगैरे...' ही मालकी हक्काची जाणीव, पुरुषांच्या मनात 'आदिबंधा'सारखी जन्मत:च घट्ट रुजून बसली आहे. भारतीय महाकाव्यांवर एक नजर टाकली तरी 'स्त्री' एका पुरुषाची मालमत्ता असते ही जाणीव मूल्य म्हणून जोपासलेली आढळते. अर्थात, एका पुरुषाच्या मालकीच्या अनेक स्त्रिया असू शकतात. त्यांचा मालक मात्र एकच. याला अपवाद द्रौपदीचा. आणि म्हणूनच दुर्योधनाने तिला एकटीला गाठून, अत्यंत कुटिल प्रश्न विचारला होता की, 'आज पाळी कोणाची' ? द्रौपदी या प्रश्नाने आरपार विंधून गेली. पण पाच पतींच्या पतिव्रतेचे हे दुःख सांगायचे कोणाजवळ? शेवटी जिवाभावाचा सखा कृष्णच, कृष्णाने तिला उत्तर देण्यास सांगितले, ते असे - 'आज शेषाची नाही...' यातून सूचित केले गेले की, दुर्योधन-भार्या भानुमती आणि शेषनाग यांचे अवैध संबंध असावेत.
 ही सारी महाकाव्ये सत्य आणि स्वप्नप्रतिमा यांच्या धुकेरी पायावर उभी असतात. पण त्यातून मानवी स्वभावाचे अत्यंत तरल पदर हाती येतात. मानवीमनतरंग/४