पान:मधुमक्षिका.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१३ )

परमानंद होईल. तर, जें कांहीं तुह्मी पाहतां ऐक- तां, 'अथवा समजतां, त्यापासून ज्ञान वृद्धिंगत होण्यासा- रखा कांहीं विचार काढावा, हें तुह्मांस उचित आहे.
 मेघ, नक्षत्रें, सूर्य, चंद्र, आणि ग्रहांच्या गति, ह्रीं • लक्ष्यपूर्वक अवलोकून त्यांचा विचार करावा. पृथ्वी- च्या उदरांत काय काय आहे, तें कशाच्या उपयोगीं आहे, व तें माणसाच्या हातीं कसें येतें, हें मनांत आ- णावें. फळे, फुलें, आणि वृक्ष, ह्यांतील चमत्कार पा हावे. पशु, पक्षी आणि इतर कीटक ह्यांची शरीरें व जीवनस्थिति ह्यांजकडे अतिसूक्ष्म दृष्टि पुरवावी; ते- करून पुष्कळ ज्ञान प्राप्त होईल, व हृदय प्रेमानंदानें भरून जाईल.
 पळें, घटिका, दिवस, मास, अयन, वर्ष, हीं एकामा - गून एक कशीं निमूटपणे चालली आहेत, व तीं आप- णास मृत्यूच्या भयंकर जबड्याकडे कशीं हळू हळू नेत आहेत, हें मनांत आणावें; आणि आपले आयुष्य फुकट न घालविण्याचा निश्चय करून तो बळकट धरावा.
 शिकंदर, अकबर, औरंगजेब, अशा अशा पराक्रमी पुरुषांचीं राज्ये, कुटुंबे, व धनें, कालचक्राखाली चिरडून जाऊन धुळीस मिळाली; तेथें आपला गरीबाचा काय पाड; संसार व संपत्ति ही दोन प्रहरची सावली आहे, केव्हां पाठमोरी वळेल ह्याचा नेम नाहीं; सर्व क्षणिक आहे; असा विचार करून ताठा, गर्व, मीपणा, अभि- मान, ह्यांचा त्याग करावा. आणि लोकांचीं मरणें पाहून व ऐकून, आपणालाही असेच एक दिवस ए- काएकीं जाणें पडेल, ह्याचें स्मरण धरावें.