पान:मजूर.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ९ वें.


संकटाची पाउलें.


 "काय ग सुगंधा, किती वाजले बरें ! " आईनें मला हांक मारून विचारलें, मी दारांत उभी होतें.
 "साडेआठ वाजून गेलें आहेत वाटतें !” मी दत्तासाहेबांच्या ऑफि- सांतल्या घड्याळाकडे डोकावून पाहून सांगितलें !
 "होय ? मग अजून संतूबाळ कां बरें आला नाहीं. इतका उशीर कधीं बाहेर राह्यचा नाहीं. बरें सकाळीं सांगून तरी गेला होताका जातांना कीं, उशीरा येणार आहे म्हणून ? " आईला दादाबद्दल जास्तच काळजी वाटू लागली. " का बरें बाळाला उशीर लागला ? दुपारी जेवला तरी होता का पोटभर ? घाईघाईनें सकाळीं जेवण जात नाहीं त्याला जेवणा कडे लक्ष असत नाहीं ! - तितकेंच कांहीं महत्वाचे काम असल्याखेरीज बाळ बाहेर राह्यचा नाहीं म्हणा ! - तूं काय ताई दारांत उभी राहून करते आहेस?"
 "मी दादाचीच वाट पहात उभी राहिलें आहें ! " सचिंतपणानें मी उत्तर दिलें.
 "वाट पाहून काय होणार ? आला तर काय बाहेरच बसेल ? ये आंत ! -रत्नुला जेवायला घातलेंस का ! नसलेंस तर घाल, तो मग नाहीं तर जेवल्याशिवाय निजायचा ! तुला भूक लागली असली तर तूं पण खाऊन घे ! संतूचाळ आल्या - " आईचें वाक्य पुरें होण्याच्या आतच जिन्यांत पावलें वाजली. दादाच आला. आज उशीर झाला होता, तरी दादाच्या संवयीप्रमाणें दादा जिन्यावरून येतांना पाय वाजवीत, जिना गाजवीत आला नाहीं. अगदीं धिमेपणानें तो आज जिना चढला होता. दादा आला, मी दारांतून दूर झालें. टोपी ट्रॅकवर फेंकली. कोट सदरा काढून वळकटीवर फेंकला. आणि हातांची गोफण मानेच्या भोंवती घालून अंगाला आळोखेपिळोखे देत सतरंजीवर वळकटीला टेकून बसला!”