पान:मजूर.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
मजूर


 "मग मी टेलिफोन पोंचण्यापूर्वीच निघालों होतों तर !-बरें, रात्रीं -साडेआठाला पुन्हां येईन. नाहीं तर सकाळी भेटेन म्हणून सांगा !-चल संतू - " मॅनेजर म्हणाला !
 “जी सरकार!” असें म्हणून संतुदादा मॅनेजर बरोबर जायला निघाला. मॅनेजरचा आवाज इतका बदबद् करीत होता, कीं, त्या बद्बपणानें माझे काळीज फाटल्या सारखे झालें !
 "कां ? संतूदादा, तसें नाहीं, असें तरी यावें लागलेंच कीं नाहीं माझ्याकडे ?" बबूताई हंसत उद्गारली !
 "काय करणार ? हुकमाची तामिली मजुरांनीं केलीच पाहिजे ! बैस म्हटलें बसायचें, ऊठ म्हटलें उठायचें. छोट्या शेटांनी सांगितलें बसलों. मजूरच मी ! न बसून सांगतों कोणाला ? साहेबांसारखा मॅनेजर असतों, तर शेटजींनीं सांगितलं असतें तरी बसलो नसतों ! चला साहेब,” म्हणून, व पुन्हा एकदां भाईला लवून वंदन करून दादा बंगल्याच्या बाहेर पडला. मॅनेजरही गेले !–
 मी आपली गोंधळून गप्प बसलें होतें ! माझ्याकडे पाहून बबूताई म्हणाली.
 "अशी ग कां गप्प बसली आहेस ? "
 आतांचा ' कादंबरीतल्यासारख्या योगायोग' लिहावा कसा याचा सुगंधाताई विचार करते आहे ! नाहीं ताई ? " असें म्हणून भाई हंसला. बबूताई हंसली, मी इंसलें !" हाच का आमचा खुशालचंद मॅनेजर तुझ्या त्या प्रकरणांतला ? - अगदी हुबेहुब स्वारीला रंगवला आहेस पहा ! आजचासुद्धां प्रसंग असाच रंगव ! फारच इफेक्टिव्ह प्रसंग आहे नाहीं ?" भाई म्हणाला व हंसला !” भाईनें संतूदादाला आतांच पाहिले होतें, पण तेवढ्यांत त्याच्या मोकळ्या स्वभावाची पारख भाईनें चटकन् केली ! व त्याची वाखाणणीही केली !
 आतांच्या प्रसंगाचा ठसा बबूताई किंवा भाई यांच्यापेक्षां माझ्या मनावर कितीतरी विलक्षण उठला असेल, याची खरोखरच त्या बहिण भावंडांना कशी कल्पना येणार ? नंतर मी फारच थोडावेळ तेथें होतें.