पान:मजूर.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
मजूर


मी व रत्नुच बबूताईकडे जात असे. दादा कधीं तिकडे आला नाहीं; त्याला यायला पण होत नसे ! तसाच भाई आमच्याकडे येई, पण त्यालाही वरचेवर यायला होत नसे ! कधीं तरी इकडे तिकडे जातांना-उभाउभी येत असे ! आईशी दोन प्रेमळ शब्द बोलायचे व " लवकरच बऱ्या व्हा ! म्हणजे आम्हांला बरें वाटेल " असें बोलून जाई. भाई आमच्याकडे आला म्हणजे आम्हांला पंचाईत पड़े ! आमच्या दीडवीत जागेत भाईला आणायची आम्हांला लाज वाटे. कित्येकदां तर खालीं दत्तासाहेबांच्या जागेंतच बसवून – तिथूनच भाईची बोळवण मी करीत असे. आमच्या जागेंत सामान तें काय असणार ? अगदी तात्पुरतेच ! पण मी तें शक्य तितकें नीटनेटकें ठेवीत असे. दादाला अजागळपणा, अव्यवस्थितपणा मुळींच खपत नसे ! त्यामुळे सगळे जिथल्यातिथें ठेवण्याची चांगलीच संवय झाली होती ! भाईला ती दीडवीत टापटीपीची जागा पाहून भारी गंमत वाटे; तो कित्येकदां बबुताईजवळ म्हणाला देखील कीं, सुगंधाताईच्या बिन्हाडांत जी व्यवस्था नीटनेटकेपणा आणि स्वच्छता आहे, ती कांहीं आमच्या एवढ्या मोठ्या बंगल्यांत नाहीं ! ती टीचभर मनोहर जागा तींत राहणाराला लक्षाधीश करील !"
 भाई एवढा मोठा कोट्याधीश पण आमच्यासारख्या मजुरमोलाच्या माणसाशीं अगदीं समभावानें वागे ! बबूताईला आमच्याशिवाय आतांशा चैन पडेनासे झालें होतें. पण या परिस्थितीनें आम्हीं हुरळून मात्र गेलों नव्हतों; किंवा स्वस्थिति विसरून गेलों नव्हतों ! तशीच, या श्रीमंतांच्या परिचयाचा फायदा कशातरी प्रकाराने त्यांना थोड्या मोठ्या लाभाच्या आशेनें लुबाडण्यांत घ्यावयाचा, हें कधीं आमच्या मनांतही आलें नाहीं.
 हें सर्व खरोखरच मला आमचें चमत्कार युग वाटत असे ! गरीब श्रीमंतांच्या स्नेहाचे धागे जमायचे म्हणजे मला अगदीं कादंबरीतल्यासारखे योगायोगाप्रमाणे वाटत असत ! मी दादाजवळ या माझ्या विचाराबद्दल शहानिशा करायला गेलें, म्हणजे तोही असेंच सांगें:-
 "आपण गरीब असलों म्हणून काय झालें ? आपण मोठे होण्याच्या लायखीचे आहोंत, आणि लवकरच मोठे होणारही आहोंत ? आपल्याला आपले जे भावी सुखाचे दिवस येणार आहेत, त्याचीं हीं पूर्व चिन्हें आहेत. श्रीमंतांनीं आम-