पान:मजूर.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
मजूर


बबूताईच्या मोटारींतून हिंडावयाला लागलो होतों ! बबूताई, तिचा भाई, यांच्या आमच्यांत दाट घरोबा होत चालला होता. मॅनेजरचें आमच्याकडे येणें जाणें पण बरेच वाढलें होतें. मॅनेजरनें दादाला बढती दिल्यावर माझ्या बद्दल दादाजवळ उघडच मागणी घालण्यास कमी केलें नाहीं. दादानें त्या बाबततिं त्याला कांहींच उत्तर दिले नव्हतें ! " आम्हीं मजुरांनी असली भलती महत्वाकांक्षा बाळगूं नये. आणि तुम्हींही आपला दर्जा सोडून मजुराच्या मुलीशी संबंध जोडण्याचा कमीपणा पत्करूं नये " अशा सारखें थट्टेनें, गंभीरपणानें, उपहासानें, सरळ, स्पष्ट, पर्यायानें- सगळ्या- रीतीनें दादानें मॅनेजरला सांगून टाकलें होतें. पण कोणत्या कुमुहूर्तावर मी त्याच्या दृष्टीस पडलें होतें कोण जाणें ? दादाजवळ माझ्या विषयीं तो जास्तच जिकीर घालू लागला होता ! दादानें त्याबद्दल त्याला एकदां दोनदां रागाने खडसावले देखील ! ' अशा नीच हेतूनें जर मला तुम्हीं प्याद्याचा फर्जी करीत असाल, किंवा केलें असेल, तर तुम्हीं दिलेल्या मोठेपणावर अशी लाथ मारतों ! मला माझी मोकदमीच पुष्कळ आहे ! बहिणीच्या मोबदल्यासाठीं लांचलुचपत म्हणून जर मोठेपणाची पदवी तुम्हीं पुढे केली असेल, तर धिःकार असो तुगच्या लांच देणाऱ्या मनो- वृत्तीला ! आणि त्याचा स्वीकार करायाला तयार होणाऱ्या मलाही ! अशा कडक शब्दानेही दादानें खुशालचंद मॅनेजरला अनेकदां धि:कारले होतें ! तरी त्याचा कांहीं परिणाम मॅनेजराच्या मनावर झाला नव्हता ! त्याला अधिकाराची धुंदी व घमेंड होती ! आपला अधिकार लोकांनी मानलाच पाहिजे. आपण सांगूं तसें लोकांनीं, हाताखालच्यांनी, स्नेह्या- सोबत्यांनींदेखील वागळेंच पाहिजे; हा त्याचा स्वभाव ! तो दादाचे शब्द कुठून ऐकणार ? त्याची खात्रीच होती कीं दादाकडून तो मला मिळविणारच !
 दादाला तरी हैं कां नको होतें ? खुशालचंद एवढ्या मोठ्या अवा- ढव्य गिरणीचा मॅनेजर, पोझिशनचा मनुष्य ! आपण होऊन दादाजवळ मला पाहिल्यावर माझ्याकरितां मागणी घालतो आहे, मग दादा त्याला कां झिडकारीत होता ? तर दादा त्याचें चरित्र अहोरात्र पहात होता. खुशालचंद सगळ्या दुर्गुणांचें, व्यसनांचें, नीचपणाचें, माहेरघर होता ! गिरणीतल्या