पान:मजूर.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ७ वें .

६१

 " पण श्रीमंतांच्या इथें गेल्यावर कसे वागायचें हें मला माहीत नाहीं- म्हणून जरा - " मी आढेवेढे घ्यायचा क्रम सोडला नाहीं. माझी समजूत कशी करायची हें बबूताईला समजेना.
 " म्हणजे ग काय ? जशी आपल्या घरांत वागतेस तशचि माझ्या इथें वाग ! - म्हणे श्रीमंतांच्या इथे कसे वागायचें ? चल, मी शिकवितें तुला कसें वागायचें तें ! ” बबूताईचा त्रासिक स्वर येऊ लागला-
 "तसे नव्हे ग बबूताई ! मी गरीब तूं श्रीमंत-"  "पुन्हां तेंच ! तूं गरीब नाहींस मी श्रीमंत नाहीं. तूं गरीब तर मी गरीब-मी श्रीमंत तर तूं पण श्रीमंतच ! ताई, मैत्रिणीजवळ कां कुठें श्रीमंतगरीवपणा असतो ! मी माझ्या भाईला, तुझ्याबद्दल, रत्नुबद्दल, आईबद्दल, आणि आपल्या संतुदादाबद्दल कित्ती कित्ती सांगितलें आहे ! त्यानें तुला आणायला सांगितले. मी आणायला आलें, तर तूं आपली अशी हुज्जत घालतेस ! माझ्या मनांतून आईला देखील आमच्याकडे घेऊन जायचें होतें. पण आई अजारी असल्यामुळे माझा इलाज नाहीं ! मी काल भाईला सांगितलें कीं, मी मला एक नवीन आई मिळविली आहे ! भाईला कित्ती आनंद झाला म्हणून सांगू ! तूं म्हणतेस, पण आमच्या भाईला सुद्धां कांहीं श्रीमंतीचा डौल नाहीं ! आमचा भाई कित्ती साधा आहे ! आमच्या बाबांनासुद्धां तुला नी रत्नुला पाहून किती तरी कौतुक वाटेल! संतदादा आमच्याकडे येणार नाहींत म्हणाले, पण त्यांना पण कधींना कधीं आमच्या इथें घेऊन गेल्याखेरीज राहणार नाहीं. बघशील तूं ! पण चलबाई, किती आढेवेढे घेशील. बोलण्यांत इथेंच सगळा वेळ जायला लागला. तुला परत आणखी आणून पोंचवायचे आहे. एवढ्या मोठ्या बबूताईच्या व्याख्यानावर मी काय बोलणार ? आईनेंही ' जाऊन ये' म्हणूनच सांगितले.
 "आजच यायला पाहिजे का ताई तुझ्या कडे ? " मी शेवटचेंच म्हणून विचारले.
 "दादा जातांना आईजवळून हलूं नको म्हणून सांगून गेला आहे !"
 "सांगू दे ! संतूदादा घरी आल्यावर त्यांना सांग-मी तुला घेऊन मेलें होतें म्हणुन. माझें नांव सांगितल्यावर ते मुळींच रागवायचे नाहींत.