पान:मजूर.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
मजूर


 "होय साहेब, कसा तरी घाईघाईनें चार घांस पोटांत लोटतो आहे ! वेळेला चाकरविर हजर झालें पाहिजे ना ? जरा उशीर झाला, तर आमचा दिवस खाडा व्हायचा ! ह्यः ह्यः ह्यः " दादा कृत्रिम इंसला. " बाकी, तो प्रसंगच आजपर्यंत आपण कधीं आमच्यावर येऊं दिला नाहीं म्हणा ! "
 "होय ना ? मग झाले तर ! मी तसा कांहीं कुणाच्या पोटावर मारायचा नाहीं ! " मॅनेजर म्हणाले.
 "हें काय आम्हांला माहीत नाहीं साहेब १ आपल्या गिरणबाबू. पैक कित्येकांनी आपण ओढलेल्या कोरड्याचे वळ उठलेल्या पाठी दाखविल्या आहेत मला. पण त्यांनी पोटावर मारल्याचीं कधींच तक्रार केल्याचे मला आठवत नाहीं ! " दादानें हंसतच उत्तर दिलें !
 “नॉनसेन्स ! संतू, तूं मोठा हा आहेस बोवा !” मॅनेजर स्वतःची उडालेली तिरपीट सांवरीत म्हणाले.
 मेनेजर अजून उभेच होते. ते अगदीं अपटुडेट पोषाखांत-कोटपाट- लूणींत होते. त्यांना तसें खालीं बसतां येणें शक्य नव्हतें. आमच्या घरीं कसलीच खुर्ची नव्हती. मॅनेजर नुसतें पहातच राहिले. दादाच्या तें लक्षांत आले; पण त्याच्याही मनांतून मॅनेजरला थोडावेळ ताटकळवीत बसविण्याची हुक्की आली, म्हणून तोही कांहीं बोलला नाहीं. पण मग माझ्यावर खोटाच रागावून ओरडला.
 "ताई, तुला कांहीं अक्कल आहे कीं नाहीं ? साहेब केव्हांचे उभे आहेत ? आपल्यासारख्या मजुरांच्या घरीं पूर्वपुण्याईनें आज केवढ्या मोठ्या महात्म्याने पायधूळ झाडली आहे. आणि त्यांना बसायला द्यायचेंही तुला भान राहिलें नाहीं ? पाट दे तो नाहींतर ती पलीकडची फाटकी सतरंजी आणून टाक ! -अडाणी कुठली ! साहेब, एक्सक्यूज अं ! - पण आपल्याला पाटावर किंवा तरटावर बसायला कसें येणार ? त्यापेक्षां ताई असें करीनास ? ती आपली ट्रंक आहे ना? ती खुर्ची- सारखी उभी करून तिथे आणून ठेव !-अग हंसतेस काय ? साहेब, आपली आमच्या गरीबाच्या घरची हीच खुर्ची समजा ! ताई, त्या ट्रंक- वर त्या सतरंजीची घडी करून टाक बरें का ? "