पान:मजूर.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ६ वें.


मॅनेजरचा फेरा.

 "संतू संतुराम, संतू – ”
 अशा कोणशा दाराच्या बाहेर हांका मारल्या आणि दारावर टिच- क्या मारण्याचा आवाजही ऐकायला आला. सकाळीं नवाची वेळ. दादा आणि रत्नु जेवायला बसले होते. मी वाढीत होतें. आई प्रातःकर्म उरकायला गेली होती. माझा हात खरकटा होता, तो धुवून दाराची कडी काढायला जाणार, इतक्यांत "संतू, संतुराम, आहेस का घरांत ? " म्हणून पुन्हां हांका आल्या. मी दाराजवळ जाईपर्यंत दादा मोठ्यानें " यस् यस् वेट् अ मिनिट ! " म्हणून म्हणाला. आम्हांला वाटलें दत्तासाहेब आले आहेत; म्हणून मी किंचित् दिरंगाईच करीत होतें. दार मुद्दाम उशीरा उघडल्याबद्दल दत्तासाहेब माझ्यावर खोटे रागवायाचे. कांहीं तरी बोलावयाचे, आणि त्यांच्या त्या बोलण्यानें आम्हांला खूप मौज वाटायची, हें अगदी ठरलेले असे; ती मौज करण्याचा बेत होता, पण दादा आज कसल्या तरी तंद्रीत होता;नेहमीसारखा विनोदी लह- रीत नव्हता. त्यानें चटकन् दार उघडायला सांगितलें म्हणून मी माझा बेत रहित केला आणि झटकन् जाऊन दाराची कडी काढली. दार उघ- डलें, तों दारांत काल पाहिलेले दादाच्या गिरणीचे ताडमाड उंचीचे खुशालचंद मॅनेजर !
 "ओल्लो ! कोण, साहेब ? गुडमॉर्निंग ! गुडमॉर्निंग ! - या आंत या असे ! " - दादानें मॅनेजर साहेबांचें आगतस्वागत केलें. मी, माझी कल्पना चुकल्यामुळे माझ्याच ठिकाण ओशाळले. आपली झटकन् चुलीजवळ जाऊन उभी राहिलें. पडदा थोडासा पुढे ओढून घेतला!
 "जेवण चाललंय वाटतं तुझं !” आंत येत मॅनेजर म्हणाले !
 म...४