पान:मजूर.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ५ वें.

४३


दोघेही मोकळ्या मनाचे ! त्यांत दादानें त्यांना आपली इत्थंभूत हकीकत सांगितली. दादा, आई, मी, रत्नु,-या वेळीं रत्नु चार पांच महिन्यांचा देखील नव्हता. बाबा वारले त्या वेळीं रत्नुची पांचवी पुजली होती ! - असो. आम्हां सर्वांकडे पाहून दत्तासाहेबांनी दादाला सांगितलें, तूं आमच्याकडे चल माझ्या ताब्यांत बरीच जागा आहे. त्यांतली तुमच्या- पुरती तुम्हांला देतों. आपला उद्योग पहा. उद्योगाचें जमलें, पैसे मिळा- यला लागले, म्हणजे, मग तुझ्या माझ्या सोयीसवडीप्रमाणें भाडे मी वसूल करून घेईन. तूं मुंबईला नवखाच आहेस. हीं दोन भावंडे, दुःखी कष्टी आई ! कुठे जाणार तूं ! - मुंबईला जाण्यापूर्वीच मुंबईच्या राहण्याची अशा प्रकारानें अनायासें सोय लागलेली पाहून आम्हांला आनंद झाला. दादा तर दत्तासाहेबांचा जिगरदोस्त बनला. प्रत्येक लहानमोठ्या कामांत तो त्यांची सल्ला मसलत घेई व अजूनही घेतो. दत्तासाहेब मला मुलीप्रमार्गे आणि दादाला मुलाप्रमाणे मानतात ! आईच्या ठिकाणीं तर त्यांची अनन्य भक्ति आहे ! दादाचा मूळचा उघडा, आनंदी, विनोदी स्वभाव—त्यांत दत्तासाहेबांची संगत मग काय विचारतां ? असल्याही गरीबीत आमच्या आनंदांत त्यामुळे वैगुण्य येत नव्हते ! दत्तासाहेबांची कसलीशी एक व्यापारी फर्म आहे. त्यांच वडिल बंधु विलायतेला गेले आहेत. आतांशा बाहेरच्या कामामुळे दत्तासाहेबही क्वचितच इथें असत ! त्यांच्या ऑफिसांतील मंडळी आहेत. पण त्यांचा तितकासा परिचय नाहीं. दत्तासाहेब आले म्हणजे विचारपूस करून आईला धीर देऊन दादाला चार गोष्टी सांगून-रत्नुला कांहीं खायला - खेळायला देऊन, माझ्या अभ्यासाची चौकशी केल्याशिवाय सहसा जात नाहीं. त्यांच्या- कडची सगळी येणारीं वर्तमानपत्रे मात्र आम्हाला नेहमी वाचावला मिळतात ! असो-
 आमची इथे आल्यापासून पांच वर्षे अशा रीतीनें कशीं तरी वेडीं- वांकडी गेली. त्यांत माझा इंग्रजी पांच यत्तेपर्यंत अभ्यास झाला. दादाला कष्ट पडत होते. पण तो नेटानें आणि चिकाटीने काढीत होता. तो श्रीमंतांपासून दूर दूर राही. पण मजुरांतून मिसळे, त्यांच्या सुखदुःखाची चौकशी करी ! हवें नको पाही ! अडीअडचणीच्या वेळीं शरीरानें व